प्रकरण  दुसरें


जीवन्मुक्त  पुरुष  व  त्यांची  राहणीलहान मुलाच्या दृष्टीला विश्वविद्यालयाच़े पदवीधर सगळे सारख्याच़ योग्यतेच़े वाटत असले तरी त्यांच्या योग्यतेमध्यें ज़से मोठाले फरक असतात, तद्वत् सर्व सिद्ध पुरुष एकाच़ योग्यतेच़े दिसत असले तरी त्यांच्यामध्येंहि न्यूनाधिक्य असूं शकतें. बी.ए., बी.एस् सी., बी.ई., एम् बी.बी.एस्., या हल्लींच्या विश्वविद्यालयाच्या पदव्या आहेत, व त्या ज्याला मिळाल्या असतील त्याला आपण ग्रॅज्युएट किंवा पदवीधर असें म्हणतों; पण एम् ए., एम्.एस् सी., एल्.एल्.एम्., एम्.डी., याहि त्याच़ विद्यालयाच्या वरिष्ठ पदव्या आहेत, व पदवीधर या सामान्य संज्ञेंत ह्याहि वरिष्ठ पदव्या मिळविणारांच़ा समावेश होत असतो. अर्थात् सर्व पदवीधर सारख्याच़ योग्यतेच़े असतात असें बिलकुल नाहीं. पुनः एकच़ पदवी दोन पदवीधरांनीं मिळविलेली असली तरी सुद्धां त्या दोघांमध्येंहि ज्ञानाच्या बाबतींत व्यक्तिपरत्वें न्यूनाधिक्य असूं शकेल, व त्यांतून ज़र एकाची पदवी पुढची असली व दुसऱ्याची मागची असली तर त्या दोघांमध्यें पुष्कळच़ फरक असणार. सिद्ध म्हणजे ज़णूं एक पदवीधर होय असें क्षणभर म्हटलें तरी च़ालण्यासारखें आहे. अमुक एका परीक्षेंत उत्तीर्ण झ़ाल्याशिवाय ज़सें आपण माणसाला पदवीधर म्हणत नाहीं, तद्वत् विकासाच्या अमुक एका पायरीपर्यंत पोहोंच़ल्याशिवाय माणसाला सिद्ध अगर मुक्त असें म्हणण्यांत येत नाहीं.  त्या पायरीच्यावरही, दुसऱ्या अनेक पायऱ्या आहेत आणि विश्वविद्यालयाच्या वरिष्ठ पदव्यांप्रमाणें त्यांनाहि निरनिराळीं नांवें आहेत. त्या पायऱ्यांसंबंधाची थोडीशी माहिती या पुस्तकांत पुढें यथाक्रम येईलच़. पण सामान्यतः बोलावयाच़ें असल्यास या सर्व पायऱ्यांवरील पुरुषांस 'पदवीधर' या संज्ञेप्रमाणें 'सिद्ध' अगर 'मुक्त' हीच़ सर्वसाधारण संज्ञा लावण्यांत येत असते. यावरून उघड आहे कीं सामान्य प्रतीच्या माणसास सर्व सिद्ध किंवा मुक्त पुरुष आकाशांतल्या ताऱ्यांसारखे स्वतःपासून सारख्याच़ अंतरावर दिसत असले, तरी त्यांतील कित्येक उत्क्रांतिमार्गावर जास्त पुढें गेलेले असतात आणि कांहीं त्या मानानें मागें असतात; आणि त्यामुळें त्यांच्यामध्यें अधिकाराच्या दृष्टीनें फरक होत असतात. या सिद्धांपैंकीं-मुक्तांपैंकीं जे स्थूलदेहधारी असतात त्यांना 'जीवन्मुक्त' म्हणतात हें पूर्वीं आम्हीं सांगितलेंच़ आहे. सांप्रत पृथ्वीवर असले पन्नास साठ जीवन्मुक्त पुरुष विद्यमान आहेत. त्यांपैंकीं कित्येकांविषयींची अल्पस्वल्प माहिती आम्हीं या प्रकरणांत देत आहों.

ते  दिसतात  कसे ?

अशी कोणतीहि बाह्य खूण नाहीं कीं, जिच्यावरून अमुक एक माणूस जीवन्मुक्त आहे असें सामान्य दर्जाच्या माणसाला बिनचूक ओळखतां येईल. जीवन्मुक्ताचा कारणदेह फार मोठा असतो, व त्यांतील नाना वर्ण विशिष्ट प्रकारानें त्याच्या दृश्य देहासभोंवतीं वर्तुलाकार रचलेले असतात. ते ज्याला पाहतां येत असतील त्याला अमुक माणूस जीवन्मुक्त आहे असें नक्की ओळखतां येईल. पण असली सूक्ष्मदृष्टि असणारीं माणसें विरळा.  कोणत्याही एका बाह्य चिन्हानें ज़री जीवन्मुक्त माणसाला नक्की ओळखणें शक्य नसलें तरी सर्व जीवन्मुक्त शांत, शुचिर्भूत, देखणे व रुबाबदार दिसतात. अशा पुरुषाची व आपली ज़र गांठ पडली तर त्याच़ा आपल्या मनावर मोठा परिणाम होतो, व त्या माणसांत कांहीं विशेष आहे, असें आपणांस वाटल्याविना राहत नाहीं. त्या सर्वांची राहणी आरोग्यशास्त्राच्या नियमांस धरून असते. कोणत्याहि गोष्टीसंबंधानें ते स्वतःला चिंता, काळजी व दगदग लावून घेत नाहींत. त्यांच़ें वाईट कर्म फार पूर्वींच़ भोगून संपलेलें असतें, आणि कर्माच्या बंधनापासून ते साफ़ मोकळे झालेले असतात. त्यामुळें सर्व जीवन्मुक्तांच़े देह उत्कृष्ट, सतेज व निकोप असतात. सामान्य माणसाच्या मानानें ते फारच़ अधिक वर्षें ज़गतात. एखादा जीवन्मुक्त पुरुष आपणाला पस्तीस चाळिशीच्या दरम्यान आहेसें वाटलें तरी तो शंभराच्या पुढेंहि असण्याच़ा संभव असतो. त्यांच़े देह जास्तींत जास्ती किती वर्षें टिकतात याची मर्यादा नक्की सांगतां येणार नाहीं. पण एखाद्या जीवन्मुक्त पुरुषाच़ा देह दीडदोनशें वर्षें टिकणें बिलकुल असंभवनीय नाहीं. [मादाम ब्लाव्हाट्स्की ह्यांच़े गुरु तिबेटांत राहतात. ते जीवन्मुक्त आहेत. त्यांचे संनिध
मादाम ब्लाव्हाट्स्की ह्या १८६६ ते १८७३ पर्यंत योगाभ्यासासाठीं राहत होत्या. डॉ.बेझ़ंट् व कर्नल् ऑल्कॉट् यांच़े गुरु हेहि जीवन्मुक्तच़ होत. त्यांची नित्य भेंट होणारीं माणसें सांगतात कीं हे जीवन्मुक्त ज़से १८६६-७३ सालीं दिसत तसेच़ ते हल्लींहि  दिसतात. पुष्कळ वर्षांच्या कालावधीनंतरहि त्यांच्या मुद्रेंत फरक झ़ालेला नाहीं व त्यांच्या चेहऱ्यावर वार्धक्याची यत्किंचितहि छटा नाहीं. मास्टर रागोझ़ी नांवाचे जे जीवन्मुक्त सध्यां युरोपांत विद्यमान आहेत ते हल्लींच्याच़ देहांत फ्रेंच राज्यक्रांतीच्या सुमारास फ्रान्समध्यें वावरत होते असें समजतें.] जीवन्मुक्तांच़े स्थूलदेह अत्यंत संस्कारक्षम असतात, आणि त्यामुळेंच़ ते आपलें अंगीकृत कार्य मोठ्या यशस्वितेनें करूं शकतात. जगांतल्या घाणींत आणि जनसंमर्दाच्या धामधुमींत त्यांच्या कामास अडथळा होतो. जीवन्मुक्त पुरुषांनीं जगाच्या धुमश्चक्रींत येऊन राहणें म्हणजे वाफेच्या एंजिनाशेजारीं सतारीच़े नाज़ुक बोल काढण्यासारखें अगर कसाईखान्यांत आसनमांडी घालून ध्यानधारणा करण्यासारखें अप्रयोजक होय. जीवन्मुक्त पुरुषांस जगाचा बाज़ार अस्वच्छ आचारविचारांनीं भरलेला अतएव हिडीस व घाणेरडा वाटतो आणि त्याच़ा उपद्रव त्यांच्या उद्योगास बाधत असल्यामुळें ते विशेष कारणाशिवाय जनसंमर्दांत येत नाहींत. बहुधा ते गिरिकंदरासारख्या निर्जन व शांत स्थळीं राहतात.

मुक्त झालेला मनुष्य हिंदुधर्मी व हिंदुस्थानांत राहणारा असला पाहिजे असें पुराणमताच्या माणसास वाटतें; पण तो समज़ च़ुकीचा आहे. मुक्ति ही प्रगतीची एक परमोच्च पायरी आहे. त्या पायरीवर फक्त एका जातीचीं, देशाचीं वा धर्माचीं माणसें जाऊन पोहोंचतील असें म्हणणें संकुचित बुद्धीचें लक्षण आहे. या पदवीला अनेक ज़ातींचीं व धर्मांचीं माणसें जाऊन पोहोंच़लेलीं आहेत. जीवन्मुक्ताचा देह ज्या ज़ातींत, धर्मांत वा देशांत जन्मला असेल त्याला कांहीं महत्त्व नसतें. त्यानें आपला देह विशिष्ट कामाकरितां साधन म्हणूनच़ घेतलेला असतो. त्यांत ज़ातीच्या,
धर्माच्या वा देशाच्या अभिमानाच़ा लेशमात्र संबंध नसतो. जीवन्मुक्त पुरुष विशिष्ट ठिकाणीं राहत असले तरी आपल्या कामासाठीं ते सूक्ष्मदेहानें पृथ्वीवर वाटेल तेथें ज़ाऊं शकतात. अर्थात् ते जेथें स्थायिक राहतात त्या ज़ागेलाहि महत्त्व नसतें; पण जाति, धर्म व देश वगैरे गोष्टी तत्त्वाच्या दृष्टीनें महत्त्वाच्या नसल्या तरी सामान्य प्रकारच्या माणसाला त्यांच़ें फारच़ अगत्य वाटत असतें. भगवान् श्रीकृष्णाच्या डोक्यावरील मोराच़ें पीस गीतेंतील शिकवणीपेक्षां कितीहि कमी महत्त्वाच़ें असलें तरी गीतेच्या अभ्यासकाला त्या मोराच्या पिसाच़ेंहि अत्यंत कौतुक वाटतें व त्याच्या भक्तींत त्यानें भर पडते हें खरें आहे. गौतमबुद्ध परमपदास जाण्याच्या वेळीं केळीच्या झाडाखालीं बसले असते काय - वा नारळीच्या झाडाखालीं बसले असते काय, त्यांच्या शिकवणीचा अभ्यास करणाऱ्याला त्याचें कांहींच़ महत्त्व वाटण्याच़ें कारण नाहीं. तथापि बुद्धगयेस ते ज्या बोधिवृक्षाखालीं बसले होते, त्याच़ वृक्षाखालीं कोणताहि प्रेमळ बुद्धभक्त आज़ ज़ाऊन क्षणमात्र बसला तर त्याच्या हृदयांत आनंदोर्मि येणें साहजिक आहे. जीवन्मुक्त पुरुष राहतात कोठें, ते दिसतात कसे, ते खातात काय वगैरे गोष्टी एका अर्थानें अगदीं गौण आहेत. पण ज्यांस अध्यात्ममार्गाची खरी आवड असेल त्यांना या गौण गोष्टीहि स्फूर्तिदायक वाटतात. म्हणून त्या आम्हीं पुढें देत आहों. त्यांच़ा दुरुपयोग करून वाचक आपले देशविषयक व जातिधर्मविषयक आग्रह आणि दुरभिमान वाढूं देणार नाहींत अशी आमची आशा आहे. जीवन्मुक्त पुरुषांकडे लौकिक आग्रहांच्या चष्म्यांतून पाहणें अगदीं गैर आहे.

जीवन्मुक्त पुरुष आपल्यासारखींच़ घरें करून राहतात. कांहींच्या घराशेज़ारीं शेतवाड्या, बागबगीचे व उपवनेंहि असतात. देहधारणेसाठीं ते आपल्यासारखेंच़ अन्नपाणी घेतात, आणि वस्त्रप्रावरणें उपयोगांत आणतात. कधींकधीं ते आपल्यासारखा प्रवासही करतात. पुष्कळ बैरागी नखें वढवितात, जटा धारण करतात, राख लावून धुनीज़वळ बसतात; खिळ्यावर बसणें, उलटें टांगून घेणें, एक हात सदा उंच़ धरून ठेवणें वगैरे नाना प्रकारचे देहदंड ते स्वतःला करतात; हे लोक पुष्कळदां अस्वच्छहि असतात. जीवन्मुक्त पुरुष व असले बैरागी यांचा काडीच़ाहि संबंध नसतो, हें वाचकांनीं विसरूं नये. [मादाम
ब्लाव्हाट्स्की म्हणतातः 'The Masters I know of are neither Yogis as known in India, who sit for ages buried in jungles, with trees growing between their arms and legs, nor do they stand for years on one leg. They are adepts in occultism and whose quarters are in a certain part of Thibet and whose members are scattered through the world. These are the men great, glorious and more learned than any on Earth.']


चार  कुमार

आपल्या पृथ्वीवर सर्व जीवन्मुक्तांची एक सुसंघटित संस्था आहे. त्या संस्थेला सिद्धसंघ, ऋषिसंघ, सिद्धांचा संप्रदाय अशीं नांवें दिलीं तर शोभण्यासारखीं आहेत. या संघांत सर्वांच्या मूर्धस्थानीं जे पुरुषश्रेष्ठ आहेत त्यांना हिंदुधर्मांत 'सनत्कुमार' असें नांव आहे. त्यांना या भूगोलावरील ईश्वराच़े प्रतिनिधि असें म्हटलें तर च़ालेल. पृथ्वीवर च़ालूं असलेल्या उत्क्रांतीवर जी सत्ता व देखरेख असते ती ह्यांची असते. हे सोळा वर्षांच्या तरुणासारखे दिसतात. ते दिसण्यांत इतके तेजस्वी आहेत कीं, त्यांच्यासमोर कांहीकांना डोळे दिपल्यासारखें वाटतें. 'सहस्र रवीहुनि तेज आगळें तुझिया वदनाला' अशी त्यांची स्थिति असून त्यांच्या मुद्रेच़ें वर्णन मोठ्या कवींनासुद्धां साधण्याज़ोगें नाहीं. तेव्हां प्रस्तुत लेखकांनीं त्यांच़ें वर्णन करूं पाहणें वेडेपणाच़ें होईल.

ह्या सनत्कुमारांच्या सन्निध सनक, सनंदन व सनातन या नांवांनीं संबोधिले जाणारे दुसरे तिघे कुमार राहत असतात. या तीन कुमारांस बुद्ध धर्मांत 'प्रत्येक बुद्ध' असें म्हणतात. हे चारी कुमार 'शंभल' नांवाच्या स्थानीं सध्यां राहत आहेत. ह्या ठिकाणाच़ा पुराणांत उल्लेख आलेला आहे. तें तिबेटाच्या उत्तरेस गोबीच्या वाळवंटानजीक आहे. [निकोलस् रोअरिक् हा रशियन कांहीं वर्षांमागें तिबेट व त्या देशाच़ा उत्तरेकडील भाग स्वतः पाहून आला. 'शंभल' हें ठिकाण तेथें जवळच़ विद्यमान असल्याबद्दलच़ा तेथील लोकमताच़ा पुष्कळ पुरावा त्यानें आपल्या The Heart of Asia  व  Shamballa या दोन पुस्तकांत प्रसिद्ध केलेला आहे.]  पूर्वीं येथें एक समुद्र होता, व त्या समुद्रांत एक बेट असे
व बेटावरून ज़मिनीवर येण्यास एक मोठा पूल असे. या बेटांत उंच़ उंच़ व विशाल अशा शुभ्र वर्णाच्या अनेक इमारती असत. ह्यामुळें त्याला श्वेतद्वीप असेंहि म्हणत. पुढें भूकंप होऊन समुद्र आटला व त्या इमारतींपैंकीं बऱ्याच़ इमारती पडल्या. या ठिकाणीं या चारी कुमारांची सध्यां वस्ती आहे. त्या चौघांच़े देह इतर जीवन्मुक्तांपेक्षां वेगळे आहेत.  ते अयोनिसंवभव आहेत, म्हणजे आईबापांच्या हाडांमांसापासून ते निर्माण झालेले नाहींत; तर त्यांचे जडदेह योगशक्तीनें तयार करण्यांत आलेले आहेत. त्यामुळें खाण्यापिण्यावांचून ते अक्षय टिकूं शकतात. भगवद्गीतेंत 'पूर्वे चत्वारः' (पूर्वींचे चार) असें जें म्हटलें आहे, तें ह्यांसच़ अनुलक्षून आहे. [गीता अध्याय १०, श्लोक ६ पहा. गीतेच्या या श्लोकाच्या अर्थाबाबत वाद आहे. लोकमान्य टिळकांच्या गीतारहस्यांत या श्लोकावर एक मोठी टीप आहे. ती पहा. डॉ.बेझंटकृत गीतेच़ें इंग्रजी भाषांतरहि पहा.]

या चार कुमारांच्या मानानें अधिकारदृष्ट्या एक पायरी खालीं असलेले तीन अधिकारी ऋषिसंघांत आहेत. पैंकीं एक भगवान् मनु, दुसरे बोधिसत्त्व, व तिसरे महाचोहण होत. [बोधिसत्त्व ही बुद्धधर्माची संज्ञा आहे. हिंदुधर्मानें त्या अधिकारास 'व्यास' असें नांव दिलेलें आहे.  'व्यास' या पुरुषासंबंधानें हिंदुधर्मांत पुष्कळ घ
ोटाळा आहे, म्हणून व्यास ही संज्ञा
येथें आम्हीं घातली नाहीं.]  या अधिकारांवरील महापुरुषांच्या उद्योगांची थोडीशी माहिती प्रस्तुत प्रकरणांत पुढें येईल; पण थोडक्यांत सांगावयाच़ें असल्यास राष्ट्रांच्या घडामोडी, त्यांच़े उदयास्त, नवीन संस्कृतीची प्राणप्रतिष्ठा, नव्या मानववंशांची स्थापना व विस्तार वगैरे उद्योग भगवान् मनूंच्या क्षेत्रांत येतात. शिक्षण व धर्मस्थापना हें कार्य बोधिसत्त्वांच्या क्षेत्रांत मोडतें व इतर साऱ्या मानवी व्यवहारांवर महाचोहणांची सत्ता असते.

मनु

आपला मानववंश म्हणजे आर्यवंश होय. ह्या वंशावर सत्ता चालविणारे जे मनु आहेत त्यांचें नांव 'वैवस्वत मनु' आहे. यांचा आश्रम हिमालयाच्या दक्षिण उतरणीवर आहे. आर्यवंशांतील सर्व माणसें म्हणजे त्यांच्यापासून जन्मलेल्या अपत्यांचा विस्तार आहे. वैवस्वत मनूंना आर्यवंशाचे आदर्श पुरुष असें म्हणण्यास प्रत्यवाय नाहीं. [हल्लींच्या मन्वंतरास वैवस्वत मन्वंतर असें हिंदुधर्मांत म्हणतात व त्या मन्वंतराचा नामोच्चार श्राद्धादि विधींच्या संकल्पांत करण्यांत येतो हें वाचकांस सांगणें नकोच.] त्यांची शरीरयष्टि फारच़ उंच़ व भव्य आहे. त्यांचें नाक गरुडासारखें किंचित् अणकुचिदार असून, डोळे पिंगट आहेत. त्यांची दाढी मोठी व लांब आहे. त्यामुळें त्यांची मुद्रा सिंहासारखी दिसते. त्यांच्या चेहऱ्यावर राजतेज विलसत असतें. त्यांची दृष्टि भेदक आहे आणि त्यांचे तेजस्वी डोळे सुवर्णाप्रमाणें लुकलुकतात. 
 

आर्यवंशाच्या पूर्वींच़ा वंश म्हणजे चिनी, ब्रह्मी, जपानी वगैरे लोकांचा
होय. त्या वंशाच्या मनूंना चाक्षुषमनु म्हणतात. त्यांचा देह चिनी आहे. त्यांच्याहि चेहऱ्यावर राजतेज दिसतें. चिनी लोकांप्रमाणें त्यांच्या गालाचीं हाडें जरा जास्त वर आलेलीं दिसतात. त्यांची मुद्रा हस्तिदंताच्या ज़ुन्या कोरीव पुतळ्यासारखी वाटते. त्यांच्या अंगावर सामान्यतः भरज़री घोळदार वस्त्रें असतात.

बोधिसत्त्व  मैत्रेय

मनूंच्या मुद्रेवर ज़शी राजसत्ता झळकत असते तद्वत् बोधिसत्त्वांच्या देहांतून प्रेम मुसमुसत असतें. बोधिसत्त्वांच्या गादीवर सध्यां असणाऱ्या महापुरुषाचें नांव भगवान् मैत्रेय असें आहे.

[यांच़े पूर्वींच़े अनेक जन्म इतिहासांत आलेले आहेत. जीझ़स् नांवाच्या शिष्याच्या देहांत ते ख्राइस्ट् म्हणून आलेले होते. भक्तिमार्गाच़े आद्य प्रवर्तक जे गोपालकृष्ण तोहि यांच़ाच़ पूर्वींच़ा एक जन्म आहे. महाभारतांतील श्रीकृष्ण व गोपालकृष्ण हे दोन वेगळे पुरुष होते असें अंतर्दृष्टीनें केलेल्या संशोधनावरून दिसून येतें. सामान्यतः ज़री ही गोष्ट हिंदूंना माहीत नसली तरी डॉ.भांडारकरांसारख्या कांहीं संशोधकांनीं कृष्ण दोन असावे असें आपलें मत नमूद केलें आहे. त्यांपैंकीं गोपालकृष्ण म्हणून जे बुद्धांच्या निर्याणानंतर लवकरच़ इतिहासाच्या रंगभूमीवर आले तो भगवान् मैत्रेयांच़ा एक जन्म होय. कृष्ण दोन असल्याचे आधार बंगालमधील चैतन्य सांप्रदायाच्या यमलतंत्र नामक ग्रंथांत पुढीलप्रमाणें आढळतात :--
   कृष्णोन्यो यदुसंभूतो, यस्तु गोपेन्द्रनंदनः ।
    वृन्दावनं परित्यज्य स क्वचिन्नैव गच्छति ।।

अर्थः- 'यादवांच्या कुळांत जन्मलेला कृष्ण दुसरा आहे. जो गोपेन्द्राच़ा मुलगा तो वृन्दावन सोडून कधींच़ बाहेर गेलेला नाहीं.'

याच़ श्लोकाचा दुसरा पाठ असा आहे :-
         कृष्णोन्यो यदुसंभूतो यः पूर्णः सो अस्त्यतःपरः ।
   वृन्दावनं परित्यज्य स क्वचिन्नैव गच्छति ।।

या श्लोकावरून वृन्दावनांत राहणारा श्रीकृष्ण पूर्णावतार होता असें होतें.  पुढील श्लोक पाहा :-

केचिद् भागवताः प्राहुरेवमत्र पुरातनाः ।
व्यूहे प्रादुर्भवेदाद्यो गृहेष्वानकदुंदुभेः ।।
   गोष्ठे तु मायया सार्धं श्रीलीलापुरुषोत्तमः ।
   एतच्चातिरहस्यत्वात् नोक्तं तत्र यथाक्रमे ।
      किं तु क्वचित्प्रसंगेन सूच्यते श्रीशुकादिभिः ।।

अर्थः- 'कोणीं पुरातन भागवतांनीं असें म्हटलें आहे कीं वसुदेवाच़े घरीं विष्णूच़ा प्रथम अवतार होईल, व यशोदेच़े घरीं लीलापुरुषोत्तमाच़ा दुसरा अवतार होईल. ही गोष्ट अतिरहस्याची असल्यामुळें तेथें क्रमवार सांगितलेली नाहीं. पण क्वचित्प्रसंगानें शुकादिकांनीं ती सूक्ष्मरीतीनें सूचित केलेली आहे.'

वृन्दावनांतले गोपालकृष्ण हेच़ पुढें वृन्दावन सोडून दुसरीकडे गेले, व मग महाभारतांत यादव कृष्ण म्हणून त्यांनांच़ संबोधण्यांत आलें असा सध्यांच्या हिंदुधर्मीयांच़ा समज आहे. पण तो बरोबर नाहीं असें पद्मपुराणांतहि सांगितलेलें आढळतें. (वृन्दावनपरित्यागो गोविन्दस्य न विद्यते। अन्यत्र यतद्वपुः तत्तु कृत्रिमं नास्ति संशयः।। पद्मपुराण,अध्याय ७७ श्लोक ६०)

इतिहासदृष्ट्या गोपालकृष्ण व यादव कृष्ण, हे एक नव्हत या मुद्द्याची हिंदुधर्मानुसार अधिक चर्चा प्रस्तुत लेखकद्वयानें लिहिलेल्या 'अंतर्ज्ञान खरें असतें काय? - उत्तरार्ध', पृ. २६ ते ३६ येथें केलेली आहे; ती वाचकांनीं पहावी.

कृष्णभक्तांची भक्ति त्यांच्या प्रगतीला पोषक होत असते. ती इतिहासावर अवलंबून नसते. भक्तानें खऱ्या मानलेल्या ऐतिहासिक गोष्टी ज़री नंतर चुकीच्या ठरल्या, तरी भक्तीनें जी भक्ताची प्रगति होत असते ती थांबणार नाहीं हें आमच्या वाचकांनीं विसरूं नये.]


भगवान् मैत्रेयांविषयीं कांहीं माहिती विष्णुपुराण, महाभारत व बौद्धधर्मांतील ग्रंथ यांमध्यें आलेली आहे. ते हिमालयाच्या दक्षिण उतरणीवर सध्यां राहत असून त्यांच़ें निवासस्थान वैवस्वत मनूंच्या आश्रमापासून फारसें दूर नाहीं. त्यांच़ा हल्लींचा देह केल्ट् उपवंशांतील आहे. त्यांच़ा चेहरा दिसण्यांत अत्यंत देखणा व मोहक आहे. त्यांच़े केस सुवर्णासारखे पिंवळे व किंचित् आरक्तवर्णी असून विपुल आहेत. ते डोक्यावर मध्यभागीं दुभंगलेले व खालीं खांद्यावर रुळत आलेले दिसतात.  त्यांची दाढी लहान व टोंकदार आहे. डोळे निळे आहेत. डोळ्यांच्या आंत प्रेम व शांति यांचीं सरोवरें ज़णूं तुडुंब भरलेलीं आहेत, असें पाहणारास वाटतें. त्यांनीं स्मित केलें असतां त्यांच्या मुद्रेंत जी मौज़ दिसते तिचें वर्णन करणें वैखरी वाणीला अशक्य आहे. त्यांच्या चेहऱ्याभोंवतीं एक तेजाच़ें वलय दिसतें व त्यांतून गुलाबी रंगाच्या प्रेमानंदलहरी सदा बाहेर पडत असतात.

त्यांच़ा आश्रम दक्षिण उतरणीवर आहे.
आश्रमांत पुढील भागीं एक मोठी थोरली खोली आहे. तिला पुष्कळच़ खिडक्या आहेत. त्या खोलींतून आश्रमाभोंवतालची बाग दिसते आणि खालीं हिंदभूमीचा अफाट विस्तार दृष्टिपथांत येतो. कधीं कधीं ते या खोलींत बसलेले असतात. बागेंत मोठाल्या फुलांच़े सुंदर ताटवे आहेत. त्यांच़ा सुगंध बागेंत सर्वत्र दरवळलेला असतो. संध्याकाळच्या प्रशांत समयीं ज़रीची काडी असलेलें शुभ्र वस्त्र परिधान करून ते बागेंत हिंडत असलेलेहि कधीं कधीं दिसून येतात.


महाचोहण

महाचोहण यांचा देह हिंदी आहे. ते अंगानें उंच़ व सडपातळ आहेत. त्यांच़ा चेहरा सुंदर व कोरीव असून हनुवटी रुंद आहे. डोळे खोल व दृष्टि खोंचदार आहे. त्यांनीं दाढी अगर मिशा ठेवलेल्या नाहींत. त्यांची मुद्रा कांहींशी उग्र आहे. बोलणें-च़ालणें जलद व लष्करी बाण्याचें आहे. ते डोक्यास सफ़ेद फेटा बांधतात व त्यांच़ा इतर पोशाख सामान्यतः हिंदी तऱ्हेच़ा असतो.

हिमालयाच्या उत्तरेस तिबेटांत शिगॅट्जी नांवाच़ें एक मोठें शहर आहे. त्या शहरापासून कांही अंतरावर एक दरी आहे. त्या दरीमधून एक लहानशी नदी वाहत आहे. या नदीवर छोटासा पूल आहे, व पुलाजवळ एक चिमणें ब्रह्मी तऱ्हेचें कळस असलेलें देऊळ आहे. या ठिकाणाज़वळ नदीच्या दोन उतारांवर सध्यां तीन जीवन्मुक्त पुरुष राहत आहेत. पैंकीं एकाच़ा आश्रम दरीच्या एका अंगाच्या उतरणीवर आहे. या जीवन्मुक्तांना पुराणांत 'मरु' असें म्हटलें आहे. थिऑसफ़ीय वाङ्मयांत यांना मास्टर एम् किंवा मास्टर मौर्य (मास्टर मोर्या) असें म्हणतात. दरीच्या दुसऱ्या बाज़ूच्या उतरणीवर दुसरे दोन आश्रम आहेत. पैंकीं एक मोठा व विस्तीर्ण असून दुसरा अगदींच़ लहान कुटीवजा आहे. पैंकीं मोठ्या आश्रमांत जे पुरुष राहतात त्यांस पुराणवाङ्मयांत 'देवापि' असें नांव दिलेलें आहे. थिऑसफ़ीय ग्रंथांत यांना 'कुठूमी' असें म्हणतात. कुठूमी नांवाची एक वेदाची शाखा आहे. तीवरून हें नांव पडलें असावें. पूर्वीं कुठूमी या शब्दाच़ें इंग्रजी स्पेलिंग् 'Koot Hoomi' असें करीत व त्यामुळें त्या जीवन्मुक्तांना त्यांच्या ह्या आद्याक्षरांवरून मास्टर के.एच्. असें संबोधण्याची प्रथा कांहीकांनीं पाडली आहे. जे छोट्या आश्रमांत राहतात त्यांचें नांव 'ज्वाल कुल' Djwal Kul असें आहे. त्यांना त्यांच्या आद्याक्षरांवरून मास्टर डी.के. असेंहि म्हणतात. यांना अलीकडे म्हणजे ६०-७० वर्षांमागें जीवन्मुक्त पदवी प्राप्त झाली आहे. पूर्वीं ते मास्टर के.एच्. यांचे शिष्य होते व त्या वेळींच़ त्यांनीं आपल्या गुरूंज़वळ राहण्याच्या उद्देशानें ही झोंपडी आपल्या हातानें बांधली आहे.


मरु  व  देवापि


मास्टर के.एच्. यांच़ा आश्रम दगडी असून मोठा आहे. पायऱ्या च़ढून आंत गेलें कीं उजव्या हातास एक मोठें दालन लागतें. त्यांत ते सामान्यतः बसलेले असतात. त्या दालनाच्या पाठीमागें दोन खोल्या आहेत. एकींत त्यांच़ा ग्रंथसंग्रह ठेवलेला आहे व दुसरी खोली निज़ण्याची आहे. दालन व या खोल्या यांच्या सभोंवार एक लांबरुंद व्हरांडा अथवा पडवी आहे. डाव्या हातास दुसऱ्या खोल्या आहेत. दालनाला पुष्कळ खिडक्या आहेत. आंत बाकें, मेज़ें वगैरे ठेवलेलीं असतात. तेथें एक ज़ुनी, नकशीदार, एका मोठ्या लांकडाच़ा ओंडा पोंखरून व तासून तयार केलेली अशी आरामखुर्ची आहे. तीवर ते पुष्कळदां बसलेले असतात. दालनांत मध्यें एक विस्तव पेटविण्याची जागा असून त्याची ऊष्णता इतर खोल्यांनाहि मिळावी अशी योजना आहे. त्या जागेच्या एका अंगाला एक विशिष्ट प्रकारच़ें इंग्रजी ऑर्गनवज़ा वाद्य ठेवलेलें आहे. ग्रंथसंग्रहाच्या खोलींत पुष्कळ व उंच़ उंच़ फळ्या असून त्यांज़वर हज़ारों पोथ्या व युरोपियन भाषांतले ग्रंथ आहेत. व त्या खोलींत एक टाइपरायटरहि आहे. त्यांच्या घरांत काम करण्यास नोकर आहेत. मास्टर के.एच्. यांच्या आश्रमांत एक स्त्री राहत असते. ते तिला बहीण म्हणून संबोधतात. ती त्यांची सख्खी वा च़ुलत बहीण अथवा पुतणी असावी, अशी कल्पना आहे. नोकरांवर देखरेख ठेवणें, घरची व्यवस्था पाहणें वगैरे कामें ही स्त्री करते. या आश्रमाभोंवतीं एक बाग आहे. तींत एक लहानसा ओढा वाहत असून त्यावर एक चिमणा पूल आहे. कुठूमी ऋषींच्या मालकीची ज़मीनहि दुसरीकडे असून माणसें लावून ते तिची लागवड करतात.

पुष्कळदां सकाळच्या वेळीं कांहीं तिबेटी लोक त्यांच्या आश्रमाशेज़ारीं ज़मलेले दिसतात आणि केव्हां केव्हां ते त्यांच्या आश्रमाच्या पडवींतहि येऊन बसतात. पुष्कळ प्रसंगीं हे ऋषि या मंडळींकडे लक्ष न देतां आपल्या कामांत मग्न असतात. कधीं कधीं ते त्यांच्या संनिध बसून आपलें भोजन उरकतात. एखाद्या वेळीं त्यांस उपदेशाच्या चार गोष्टीहि ते सांगतात. डाळभात, भाजी, साखर घातलेल्या गव्हाच्या रोट्या
वगैरे पदार्थ त्यंच्या जेवणांत असतात. ते आरामखुर्चीवर स्वस्थ पडले आहेत किंवा आपल्या बागेंत ओढ्यापाशीं शांत वृत्तीनें निश्चल बसले आहेत असें कधीं कधीं इतर लोकांस आढळून येतें. नित्याची माहिती असल्यामुळें ते त्या वेळीं समाधींत आहेत हें इतर लोक ओळखतात आणि त्यास व्यत्यय करीत नाहींत. या वेळीं अंतरंगाच्या भूमिकेवरून सर्वत्र सामर्थ्याच़े झ़रे सोडून पृथ्वीवरील हज़ारों लोकांचीं हृदयमनें अंकुरित करण्याचा त्यांच़ा उद्योग सुरूं असतो. कधीं कधीं ते वर उल्लेखिलेलें वाद्य वाज़वीत असतात. त्यांनीं त्या वाद्याशीं गंधर्वांच़ा संबंध ज़ोडून दिलेला आहे आणि म्हणून तें वाज़ूं लागलें कीं पृथ्वीवर कधींहि ऐकावयास न मिळणारे स्वर त्या वेळीं उत्पन्न होतात. हे जीवन्मुक्त ऋषि सामान्यतः पांढरा पोशाख करितात व डोक्यावर बहुशः कांहींच़ शिरस्त्राण घालीत नाहींत.

समोरच्या उतरणीवर ज़रा खालच्या अंगास दुसरे जे जीवन्मुक्त महर्षि मौर्य किंवा मास्टर एम्. आहेत, त्यांच़ा वाडा (आश्रम) आहे. त्या वाड्याच्या रस्त्यासमोरील बाजूस खालच्या, वरच्या अशा दोन्हीं मज़ल्यांवर पडव्या असून त्यांस सर्वभर कांच़ेचीं तावदानें लावलेली दिसतात. हा आश्रम पुलाच्या अगदीं नजीक आहे. आश्रमाज़वळ एक अति-विस्तीर्ण गुहा आहे आणि तींत प्रचंड दालनें आहेत. ह्या गुहेला वस्तुसंग्रहालय म्हणतां  येईल. ऋषिसंघाच्या वतीनें मास्टर कुठूमी (मास्टर के.एच्.) हे तेथील व्यवस्थापक असून तें त्यांच्या ताब्यांत असतें. पृथ्वीवरील सर्व प्रकारच़े पूर्वींच़े उत्क्रांतिप्रवाह दाखविणारीं - मानवांच़ा पूर्वेतिहास शिकविणारीं - प्राचीनकालच्या भूप्रदेशावरील घडामोडी, मानववंशाच्या निरनिराळ्या शाखांचीं दिग्भ्रमणें, निरनिराळ्या धर्मांच़ा प्रसार वगैरे इतिहास सांगणारीं - मोठालीं मॉडेल्स् व नकाशे येथें आहेत. 'ज्ञानसूत्रें' या गूढ ग्रंथाची [हा Stazes of Dzyan नामक एक अत्यंत पवित्र असा ग्रंथ आहे. त्याचें वर्णन मादाम ब्लाव्हाट्स्की यांच्या 'The Secret Doctrine' मध्यें आहे.] मूळ प्रत, ख्राइस्ट् व बुद्ध यांनीं लिहिलेलीं हस्तलिखितें वगैरे कितीतरी वस्तु या प्रचंड ग्रंथसंग्रहालयामध्यें ठेवलेल्या आहेत.

मास्टर कुठूमी हे काश्मिरी ब्राह्मण आहेत व वर्णानें इंग्रज़ माणसाइतके गोरे दिसतात. त्यांच्या डोक्यावरच़ा केशकलाप विपुल आहे. त्यांची मुद्रा प्रेमपूर्ण व आनंदी असून डोळे निळे दिसतात. त्यांची दाढी रंगानें पिंगट आहे व तीवर प्रातःसूर्याचे किरण पडले म्हणजे ती आरक्त होऊन मोठी शोभिवंत दिसते. भगवान् मैत्रेयांच्या मागून बोधिसत्त्वांच़ा अधिकार ह्यांच्याकडे यावयाचा आहे.

मास्टर मौर्य हे या जन्मीं रजपूत राजकुलांत जन्मलेले आहेत. [मास्टर मौर्य यांस संस्कृत ग्रंथांत मरु व मास्टर के.एच् यांस देवापि अशीं नांवें आहेत. त्यांच्या संबंधाच़े पुढील श्लोक भागवतांत आढळतात :-

देवापिः शंतनोर्भ्राता मरुश्चैक्ष्वाकुवंशजः।
कलाप-ग्राममासाते महायोगबलान्वितौ।।
तौ हि एत्य कलेरन्ते वासुदेवानुशिक्षितौ।
वर्णाश्रमयुतं धर्मं पूर्ववत् प्रथयिष्यतः।।
                                                                                 भागवत १२-२-३७ व ३८

   अर्थः- शंतनूच़ा भाऊ देवापि व इक्ष्वाकुवंशांतला मरु हे महायोगी सामर्थ्यवान् असून कलापग्रामीं राहत आहेत. ते दोघे कलियुगाच्या अंतीं वासुदेवाच्या आज्ञेनुसार पुढें येऊन वर्णाश्रमधर्म पूर्वींप्रमाणें प्रसृत करतील.]

त्यांची दाढी काळी असून हनुवटीच्या खालीं दुभंगलेली असते. सर्व केंस काळे आहेत व ते खांद्यापर्यंत येतात. डोळेहि काळेभोर असून त्यांची दृष्टि अत्यंत कुशाग्र दिसते. ते उंच़, भव्य व किंचित् उग्रच़ आहेत, आणि त्यांच़ें बोलणें-च़ालणें जवानमर्द शिपाईगड्यासारखें वाटतें. त्यांचें बोलणें थोडें असतें व तुटक वाटतें. त्यांची ओजस्वी मुद्रा पाहून हा पुरुष सामर्थ्याचा महामेरु आहे, त्याची शक्ति अमोघ आहे, आपण त्याचें म्हणणें शिरसावंद्य मानलें पाहिजे अशी माणसाची भावना होते. वैवस्वत मनूंच्या हाताखालीं हे सध्यां कार्य करतात व पुढें मनूंच्या गादीवर बसणार आहेत. १८५१ सालीं एक हिंदी राजपुत्र म्हणून ते त्या सालच्या लंडनच्या प्रदर्शनास गेले होते व त्यांची व मादाम ब्लाव्हाट्स्की यांची लंडनमध्यें त्या सुमारास गांठ झाली होती.
मादाम ब्लाव्हाट्स्की यांच़े गुरु हेच़ होत. ते व मास्टर के.एच्. या दोघांनीं बाईंच्या व कर्नल् ऑल्कॉट् यांच्या हस्तें १८७५ सालीं थिओसॉफ़िकल सोसायटी स्थापन केली. [मास्टर के.एच्. हे पूर्वींच्या एका जन्मांत पायथॅगोरस् या नांवानें प्रसिद्ध होते. दुसऱ्या एका जन्मांत ते नागार्जुन होते.] मास्टर मौर्य हे डोकीस एका विशिष्ट रीतीनें फेंटा बांधतात. मास्टर मौर्य व मास्टर के.एच्. यांना कधीं कधीं आपल्या उद्योगांसाठीं लांबवर जावें लागतें व अशा वेळीं ते दोघे घोड्यावर बसून प्रवास करतात.

इतर  जीवन्मुक्त

पृथ्वीवर सध्यां आणखी अनेक जीवन्मुक्त विद्यमान आहेत. त्यांपैंकीं कांहींच़ा थोडासा उल्लेख करूं या. यूरोपमध्यें एक जीवन्मुक्त राहत असतात. ते रागोझ़ी कुटुंबांतले असल्यामुळें त्यांना पुष्कळ लोक मास्टर रागोझ़ी असें म्हणतात. त्या कुटुंबाच्या मालकीच़ा एक ज़ुना किल्ला पूर्व यूरोपमध्यें आहे. तेथें त्यांची वसति प्रायः असते. मेसनरीच़ा संप्रदाय व जगांतील सर्व धर्मांतले विधिसंस्कार या गोष्टींकडे यांच़ें विशेष लक्ष असतें. यूरोपमधील राजकीय घडामोडींशींहि त्यांच़ा संबंध आहे. [रॉजर बेकन् व फ्रान्सिस् बेकन् हे त्यांचे पूर्वींच़े दोन जन्म इतिहासप्रसिद्ध आहेत.]

दुसरे एक जीवन्मुक्त
ज़ातीचे ग्रीक आहेत. त्यांच़ा ईजिप्त देशाशीं संबंध आहे. त्यांना मास्टर सिरॅपिस म्हणतात. मास्टर हिलेरियन नामक जीवन्मुक्तहि ग्रीक आहेत. बहुतेक साऱ्या जीवन्मुक्तांमध्यें हे अधिक देखणे दिसतात. पूर्वीं जे जीझ़स् म्हणून इतिहासांत होऊन गेले त्यांना ओळखण्यासाठीं मास्टर जीझ़स् असें नांव आपण येथें त्यांना देऊं या. त्यांच़ा सध्यांच़ा देह सीरिया देशच़ा आहे. ते वर्णानें सांवळे आहेत, त्यांच़े डोळे काळे आहेत, दाढीहि काळी आहे, ते सामान्यतः पांढरा पोशाख करतात व त्यांच़ा फेंटाहि पांढरा असतो. सर्व जगभर भक्तिमार्गाच़ा परिपोष करणें हें त्यांच़ें कार्य आहे. सध्यां हे लेबानन पर्वताज़वळ ड्रूझ लोकांत राहतात. हिंदुस्थान देशांत श्रीरामानुजाचार्य म्हणून हेच़ पूर्वीं जन्म घेऊन आले होते. हिंदुस्थान देशाच़ा योगक्षेम पाहणारे एक ऋषि हिंदुस्थानांत नीलगिरि पर्वताज़वळ राहतात. थिऑसफ़ींतल्या कांहीं पुस्तकांत त्यांना 'ज्यूपिटर' हें सांकेतिक नांव देण्यांत आलें आहे. संस्कृत ग्रंथांत 'अगस्त्य' म्हणून संबोधलेले जे ऋषि तेच़ हे. जीवन्मुक्त ऋषींमध्यें केंस पिकलेलीं माणसें प्रायः दिसत नाहींत; पण यांच़े केंस थोडेसे पिकलेले आहेत. यांच्या मालकीची एक शेतवाडी आहे. यांच़ा हल्लींच़ा देह ब्राह्मणकुलोत्पन्न आहे.

जीवन्मुक्त पुरुष प्रसिद्धपणें जनतेमध्यें येऊन राहत नाहींत, हें तज्ज्ञांस माहीत आहे. पण ते कधींच़ कोणास दिसत नाहींत असें मात्र नाहीं. ते एखाद्या वेळीं लोकांमध्यें आले तरी अमुक अमुक पुरुष जीवन्मुक्त आहे हें ओळखण्याची दृष्टि सामान्य लोकांना नसते हें विसरतां कामां नये. कांहीं जीवन्मुक्त कधीं कधीं प्रवास करीत असतात आणि म्हणून ते निरनिराळ्या लोकांच्या दृष्टीस पडण्याच़ा संभव उत्पन्न होतो. तिबेटांतील ऋषि कुठूमी यांच्या आश्रमानजीक तिऱ्हाईत लोक वारंवार येतात. त्यांच़ा उल्लेख वर आलेला आहे. ते व ऋषि मौर्य यांनीं सत्तर ऐंशीं वर्षांपूर्वीं हिंदुस्थानच्या कांहीं भागांत पर्यटन केलेलें आहे. मास्टर रागोझ़ी यांची व श्री.लेडबीटर यांची रोम शहरामध्यें एकदां एका टेकडीवर सहज़ासहजीं गांठ पडली होती. थिओसॉफ़िकल सोसायटींत पूर्वीं श्री.टी.सुबराव नांवाचे एक सुप्रसिद्ध पुढारी होते. ते व श्री.लेडबीटर हे नीलगिरींतील उपरोक्त जीवन्मुक्तांच्या घरीं त्यांच्या आमंत्रणावरून गेले होते. त्यांच्या घरीं ते एक दिवस राहिले आणि तेथेंच़ ते दोघे जेवून मग परत आले. श्री.एस्.रामस्वामी अय्यर या गृहस्थास तिबेट देशच्या हद्दीनजीक ऋषि मौर्य हे एकदां भेंटले होते व मादाम ब्लाव्हाट्स्की यांस ते इंग्लंडमध्यें तत्पूर्वीं भेंटले होते. असल्या गोष्टींचा विचार केला तर सर्व जीवन्मुक्त पुरुष जनसंमर्द अगदींच़ टाळतात असें वाटण्याचें कारण नाहीं. [मास्टर एम् यांच्या तिबेटांतील आश्रमासंनिध मादाम ब्लाव्हाट्स्की या १८७० च्या सुमारास कांहीं वर्षें राहत होत्या. कर्नल् ऑल्कॉट् यांना न्यूयॉर्क शहरीं मास्टर एम्. हे थिओसॉफ़िकल सोसायटीच्या प्रारंभ काळच्या सुमारास भेंटले होते. त्या प्रसंगाची हकीकत कर्नल् ऑल्कॉट् यांनीं लिहून ठेवलेली The Old Diary Leaves vol.I पृ.३७९-३८१ वर सांपडेल. तिबेटच्या सरहद्दीनजीक मास्टर एम्. हे एकदां श्री.एस्.रामस्वामी अय्यर यांना वर लिहिल्याप्रमाणें भेंटले होते. त्याची हकीकत The Master & the Path या पुस्तकांत (द्वितीयावृत्ति) दिलेली आहे. मास्टर एम्. व मास्टर के.एच्. यांनीं थिओसॉफ़िकल सोसायटीच्या स्थापनेनंतर हिंदुस्थानांतल्या कांहीं भागांतून प्रवास केलेला आहे व कांहीं मंडळींस ते त्या प्रवासांत भेंटलेलेहि आहेत. कांहीं मंडळींशीं त्यांनीं थोडाफार पत्रव्यवहारहि केलेला आहे. त्यांचीं कांहीं पत्रें अड्यार येथें ज़पून ठेविलेलीं आहेत. त्यांच्या पत्रव्यवहारांतील कांहीं भाग C.Jinarajadasa यांनीं The Letters from the Masters of Wisdom नांवाच्या दोन पुस्तकांत प्रसिद्ध केलेला आहे. १८८४ च्या आसपास राष्ट्रीय सभेच़े जनक श्री.ए.ओ.ह्यूम् आणि थिओसॉफ़िकल सोसायटीच़े एक प्रमुख सभासद श्री.सिनेट या दोघांच़ा मास्टर के.एच्. व मास्टर एम्. यांच्याशीं बराच़ मोठा पत्रव्यवहार च़ालूं होता. त्या वेळीं या गृहस्थांस मास्टर्सचीं जीं पत्रें आलीं तीं प्रसिद्ध होऊं नयेत अशी त्या मास्टर्सची इच्छा त्या पत्रांतच़ नमूद असतांहि त्या इच्छेविरुद्ध बार्कर नामक एका गृहस्थानें त्या सर्व पत्रांच़ें एक लठ्ठ पुस्तक छापून प्रसिद्ध केलेलें आहे !  त्या पुस्तकाचें नांव Mahatma Letters असें आहे.]  उलट पक्षीं त्यांतले कांहीं कधीं कधीं लोकसमाजांत येतात असें मानण्यास भरपूर पुरावा उपलब्ध आहे. त्यांच्या उद्योगांस एकान्त जास्त उपयोगी असतो. रिकाम्या चौकशा करणारीं माणसें त्यांस उपद्रवकारक होतात. त्यांच्या उद्योगांपैंकीं बराच़ भाग सामान्य जनांस न समज़ण्यासारखा असतो व कांहीं भाग तर गुप्त ठेवणें अवश्य असतें. खेरीज़ सामान्य जनसमूहाची राहणी व जगांतील विचार-वासनाविषयक वातावरण हीं त्यांस गलिच्छ वाटतात. असल्या विविध कारणांमुळें ते जनसमूहापासून सामान्यतः दूर राहतात.

जीवन्मुक्त पुरुष कल्पनामय वातावरणांत कांहीं तरी काल्पनिक मनोराज्यें करीत असतील, असें आमच्या वाचकांस वाटण्याचा संभव आहे. पण तसें बिलकुल नसतें. जगांत उद्योग करणाऱ्या माणसांचे व्यवसाय ज़से स्पष्ट, रेखीव व भरीव असतात तसेंच़ या जीवन्मुक्तांच़ें असतें. सर्व जीवन्मुक्तांना योगसामर्थ्य असल्यामुळें ते ज़री नाना देशांत राहत असले तरी ते हवे तेव्हां परस्परांस भेंटूं शकतात, आणि एकाच़ महाकार्याच़े निरनिराळे भाग आपापसांत वांटून घेऊन व्यवस्थित रीतीनें ते उरकूं शकतात. एखाद्या राष्ट्रांतील सरकारी खातीं पाहिलीं किंवा एखाद्या मोठ्या संस्थेच्या शाखा व उपशाखा पाहिल्या म्हणजे त्यांत ज़शीं निरनिराळीं क्षेत्रें निरनिराळ्या अधिकाऱ्यांमध्यें वांटलेलीं आढळतात, तसेंच़ या साऱ्या ऋषितुल्य जीवन्मुक्तांच़ें असतें. त्यांत प्रत्येक पुरुषाच्या वांट्यास आलेलें काम त्याच्या योग्यतेवर, कर्तबगारीवर व ज्ञानावर अवलंबून असतें; त्यांत वशिल्याच़ा किंवा वैयक्तिक आवडीनिवडीच़ा प्रश्न नसतो. म्हणूनच़ या सर्व जीवन्मुक्तांच़ें कार्य अगदीं व्यवस्थितपणानें व सुरळीत च़ालतें. ईश्वराच़ें पृथ्वीवरील कार्य नीटपणें करण्यासाठीं त्यांची एक सुसंघटित संस्था आहे व वर उल्लेखिलेले सनत्कुमार हे त्या संस्थेच्या मूर्धस्थानीं आहेत हें वर आलेंच़ आहे. कांहीं जीवन्मुक्त पुरुष होतकरू शिष्यांस जे हातीं धरतात त्यांतला त्यांच़ा हेतु त्या माणसांच़ा प्रवेश या संस्थेंत यथाक्रम व्हावा, असा असतो आणि त्यांतल्या खालच्या पायऱ्यांवरील कामें या होतकरूंना प्रथम देण्यांत येतात. जसजशी त्यांची योग्यता वाढेल तसतशीं वरचीं कामें त्यांच्या वांट्यास येतात आणि अशा रीतीनें जगाचें उत्तरोत्तर उच्च प्रकारच़ें काम करीत करीत ते होतकरू पुरुष स्वतः मोक्षपदापर्यंत पोहोंच़तात.


त्यांचा  हिशेबीपणा

सर्व जीवन्मुक्त पुरुष हिशेबी असतात. त्यांची शक्ति पुष्कळ असली तरी ते ती कधीं फुकट घालवीत नाहींत. पुष्कळ विदेहमुक्त पुरुष जगद्हितार्थ तपःसामर्थ्याच़ा संचय करीत असतात व त्या सामर्थ्याच़ा योग्य व्यय करण्याचें कार्य कांहीं जीवन्मुक्तांकडे (सदेहमुक्तांकडे) असतें. अर्थात् या शक्तीच़ा अनाठायीं खर्च़ होणार नाहीं याची ज़बाबदारी त्यांच़ेवर असते. म्हणून तंतोतंत हिशेब केल्याशिवाय कोणताहि जीवन्मुक्त आपलें सामर्थ्य खर्च़ करीत नाहीं. जीवन्मुक्त पुरुष कोणत्याहि होतकरू माणसाला शिष्य म्हणून हातीं धरण्यापूर्वीं नीट हिशेब करतात. त्या माणसाला हातीं धरून काम शिकविण्यापायीं त्या जीवन्मुक्ताला आपली शक्ति वेंच़ावी लागते, इतर उद्योगांतलें आपलें लक्ष कांहीं प्रमाणांत काढून घेऊन त्या उद्योगाची हानि सोसावी लागते. त्या होतकरू शिष्याला हातीं धरण्यांत जितकी शक्ति खर्च करावी लागेल त्यापेक्षां त्या माणसाच्या हातून अधिक कार्य होईल, असा संभव वाटल्याशिवाय कोणींहि जीवन्मुक्त त्याला शिष्य म्हणून हातीं धरीत नाहींत. बागेच़ा माळी पाट काढून झाडांच्या मुळांत पाणी घालीत असतो. एखादा नवा पाट काढून त्या पाटामधून नवीन पाणी नवीन झाडांस लावण्याचा उपक्रम करण्यास तो केव्हांहि तयार असतो. पण त्या नव्या पाटांतून झाडांस पाणी पोहोंच़ण्याऐवजीं तें पाणी ज़र त्या पाटांतच़ जिरूं लागेल, तर तो असला नवा पाट कधींहि खोदणार नाहीं. जीवन्मुक्त हे बागवानासारखे असून जगाच्या बगीचास जीवन पुरविणें हें त्यांच़ें काम असतें. शिष्य पाटासारखा असतो; अर्थात् ज़र त्या शिष्याच़ा भरपूर उपयोग होण्यासारखा नसेल तर ते जीवन्मुक्त त्याला हातीं धरून शिकविण्यांत आपली शक्ति कदापि फुकट दवडणार नाहींत. हा त्या जीवन्मुक्तांच्या आवडीच़ा प्रश्न नसतो. वशिल्याच़ा नसतो. येथें धर्माच़ा, स्त्री वा पुरुष यांच़ा, वयोमानाच़ा, वर्णाच़ा वगैरे बिलकुल प्रश्न नसतो. शिष्य आपल्या कार्यांस किती उपयोगी पडेल इतकाच़ येथें हिशेब करावयाच़ा असतो आणि फक्त त्या एकाच़ दृष्टीनें जीवन्मुक्त पुरुष जगांतील होतकरू माणसांस आपल्याज़वळ ओढीत असतात. भावी शिष्यानें तितकी योग्यता अंगीं आणली कीं त्याच़ा अंगीकार अवश्यमेव केला जातो आणि तितकी योग्यता अंगीं नसली तर त्यास अवश्यमेव नकार मिळतो; असा हा धारवाडी काट्याच़ा न्याय आहे.

हे जीवन्मुक्त पुरुष कधीं कधीं आपल्या कार्यार्थ एकत्र ज़मतात. वैशाख पौर्णिमेला हिमालयांत एका ठराविक ठिकाणीं पुष्कळ जीवन्मुक्त दरवर्षीं एकत्र ज़मण्याचा परिपाठ आहे. त्यावेळीं पुष्कळ शिष्यहि तेथें जमतात. दर सात वर्षांनीं 'शंभल' या ठिकाणीं या ऋषिसंघांतले फक्त वरच्या पायरीच़े अधिकारी एकत्र गोळा होत असतात. कधीं कधीं नवीन माणसास दीक्षा देण्याच़े जे समारंभ होतात त्याहि वेळीं कित्येक जीवन्मुक्त व त्यांचे शिष्य एकत्र ज़मण्याच़ा प्रसंग येतो. अशा वेळीं स्थूलदेहानें सर्व लोक येतात असें नाहीं. हीं सर्व माणसें पृथ्वीवरील नाना देशांत दूर दूर राहत असल्यामुळें असल्या मेळ्यांच्या प्रसंगीं तीं सूक्ष्मदेहानें हज़र होतात व ज़रूर तेव्हां योगसामर्थ्यानें त्या देहाला दृश्य स्वरूप देतात. हे जीवन्मुक्त पुरुष कधीं कधीं आपल्या कार्यासाठीं इतर लोकांसारखे जन्म घेतात. पण तसें केल्यास बालदेह मोठा होईतोंपर्यंत त्यांस त्याच़ा उपयोग करतां येत नाहीं, व तोंवर वाट पहावी लागते; आणि त्या देहाच्या वाढीवर देखरेख ठेवावी लागते. कधीं कधीं अशा रीतीनें न जन्मतां जीवन्मुक्त पुरुष आपल्या एखाद्या शिष्यास जन्मास घालतात व तो शिष्य मोठा झाल्यावर त्याच़ा आयता देह स्वतः घेतात. असें केल्यानें देह मोठा होईपर्यंतच़े श्रम व काळ हीं वाच़ून ती शक्ति त्या जीवन्मुक्ताला आपल्या उद्योगांत दुसरीकडे उपयोगास आणतां येते. पण अशा रीतीनें घेतलेला देह आयत्या तयार शिवलेल्या कोटासारखा होण्याच़ा संभव असतो. तो कोट ज़सा घालणाराच्या अंगांस अगदीं ठाकठीक होत नाहीं, तद्वत् असल्या देहाची स्थिति होण्याच़ा संभव असतो. कधीं कधीं पुष्कळ जीवन्मुक्त पुरुष दुसऱ्याच़ा देह कायमपणें घेत नाहींत. त्यांच़ा स्वतःचा स्थूलदेह त्यांच्या निवासस्थानीं आपले उद्योग करीत असतो व जगांतलें एखादें काम करावयाचें असेल तर तेथें असलेल्या शिष्याच्या देहांत ते कांहीं काळ प्रवेश करतात आणि काम संपल्यावर त्या शिष्याच्या जीवात्म्याला तो देह परत देतात. अशा रीतीनें त्यांनीं ज़र एखाद्या देहाच़ा उपयोग केला असला तर त्यावर चांगल्या प्रकारच़े संस्कार होऊन तो सुधारतो व त्याच़ा त्या शिष्याला फार फायदा होत असतो; आणि त्या जीवन्मुक्तांच्या इतर व्यवसायांत फारसा व्यत्यय येत नाहीं. कधीं कधीं एखादे जीवन्मुक्त पुरुष आपल्या ज़ाणिवेचा कांहीं अंश योग्य अशा शिष्याच्या अंतर्यामीं प्रस्थापित करतात आणि अशा प्रकारें प्रकट होऊन आपलें उद्दिष्ट कार्य तडीस नेतात. देहधारणेच्या त्यांच्या अशा अनेक तऱ्हा असतात व सारासार विचार करून व आपली शक्ति फुकट वेच़ली जाणार नाहीं याची काळजी घेऊन, विशिष्ट स्थळीं व काळीं या अनेक प्रकारांपैंकीं कोणता तरी मार्ग निश्चित करून जीवन्मुक्त पुरुष आपल्या उद्योगासाठीं योग्य त्या रीतीनें जगांत ज़रूर तर प्रकट होत असतात.

  *  *  *  *  *

back to bindhast : home          अनुक्रमणिका         प्रकरण ३ : ऋषिसंघाच्या कार्याची भूमिका