प्रकरण  पहिलें


विषयप्रवेशमहाराष्ट्रांतील आद्य संतकवि जे मुकुंदराज त्यांनीं आपल्या 'परमामृता' च्या शेवटीं  'हें शास्त्र गौप्य करावें।  कवणा स्फुट न सांगावें।  तुझें तुवां अनुभवावें। गुरुगम्य हें।। गुरुसंप्रदायाची वाट। न धरतां करिशी प्रगट। तरी गुज घेऊन चावट। होतील बहु।।' असें म्हटलें आहे. (परमामृत प्रकरण १४, ओंवी १८ व पुढील ओव्या पहा.) त्यावरून हिंदुधर्मांतला सगळा भाग सर्वांसमोर उघडपणें मांडण्यांत येत नाहीं, तर कांहीं भाग मुद्दाम गुप्त ठेवण्यांत येत असतो हें उघड आहे. गुरुसंप्रदायाच्या वाटेविषयींची माहिती हिंदुधर्मांत गुप्त ठेवलेली आहे. श्रीज्ञानेश्वरांनीं या मार्गाला 'पंथराज' अर्थात् सर्व मार्गांचा राजा असें म्हटलें आहे. 'जिये मार्गींच़ा कापडी महेश अजुनी'  म्हणजे  'साक्षात् शंकरहि त्या मार्गानें अद्याप पुढें च़ालले आहेत' असें सांगून ज्ञानेश्वरांनीं हा मार्ग फारच़ लांबच्या पल्ल्याच़ा आहे असें ध्वनित केलें आहे. ज़ुन्या काळीं अनेक योगी-जन या मार्गानें गेले असल्यामुळें आतां त्यांच्या अनुभवाच्या पावलांनीं ही वाट मळलेली आहे; व  'पाठीं महर्षी येणें आलें। साधकांच़े सिद्ध ज़ाहले। आत्मविद थोरावले। येणेंचि पंथें।।'  असें ज्ञानेश्वरांनीं त्याच़ें वर्णन केलें आहे. (पहा ज्ञानेश्वरी अध्याय ६, ओव्या १५०-१६०).  'क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया। दुर्गं पथः तत् कवयो वदन्ति।। '  हें या मार्गाचें उपनिषदांतर्गत वर्णन सर्वप्रसिद्धच़ आहे. या वर्णनावरून मानवी विकासाचा एक उत्तमोत्तम मार्ग प्राचीन काळापासून अस्तित्वांत असला पाहिजे हें स्पष्ट होतें. इतर साऱ्या धर्मांत असेंच़ सांगितलें आहे. जे या मार्गानें पुढें गेलेले असतात, ते सहज़च मागच्यांस साहाय्य करीत असतात. हा मार्ग म्हणजे आध्यात्मिक उत्क्रांतीचा मार्ग होय. या मार्गानें प्रगति करणारा माणूस ज्ञान, प्रेम, सामर्थ्य वगैरे नाना गुणांच़ा स्वतःमध्यें विकास करीत असतो. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत त्यांची वाढ झाली म्हणजे तो माणूस मुक्त झाला असें म्हणतात. ही मर्यादा इतकी पुढची आहे कीं, येथें मानवी विकासाची परमसीमा होते, असें कोणालाहि वाटण्याज़ोगें आहे.

मुक्तीची  पायरी

मुक्त झ़ालेलीं माणसें सारीं एकाच़ प्रकारचीं व समान दर्जाचीं असतात असें नाहीं. सामान्य प्रतीच्या माणसांच्या मनाला तीं ज़री सारीं ईश्वरासमान दिसत असलीं, त्या सर्वांच़ा गुणविकास ज़री परमावधीच़ा झ़ालासा वाटला, तरी त्यांच्यामध्येंहि निरनिराळे प्रकार व पायऱ्या असतात. कांहीं 'मुक्त' जड देह कायम ठेवून त्या देहानें पृथ्वीवर ईश्वराच्या संकल्पास साहाय्यक असे उद्योग करीत राहतात; त्यांस 'जीवन्मुक्त' असें म्हणतात. यांपैंकीं कांहीं मुक्त पुरुष होतकरू माणसांना हातीं धरून आपण स्वतः ज्या मार्गानें प्रगति केली, त्या मार्गानें त्यांचीहि प्रगति करवितात.

कांहीं जीवन्मुक्त पुरुषांचीं कामें अशा प्रकारचीं असतात कीं होतकरू माणसांना त्यांनीं हातीं धरलें तर त्यांच्या कामांत व्यत्यय येईल. हे जीवन्मुक्त पुरुष शिष्यांच़ा अंगीकार करून त्यांच्या प्रगतीची जबाबदारी आपल्या अंगावर घेत नाहींत. कांहीं मुक्त पुरुष आपल्या ह्या दृश्य सृष्टींतील उद्योग करीत नसल्यामुळें त्यांनीं स्थूलदेहाची उपाधिहि ठेविलेली नसते. अर्थात् त्यांना दृश्य देह नसतो. त्यांना 'विदेहमुक्त' असें नांव आहे.

[याच़ा अर्थ असा नव्हे कीं त्यांना मुळीं देहच़ नसतो. त्याच़ा अर्थ असा कीं त्यांना जडदेह नसतो. ते आपल्या सूक्ष्मदेहानें सूक्ष्मसृष्टींतील कोणतें तरी कार्य अंगावर घेऊन ईशसंकल्पास साहाय्य करीत असतात. स्थूलदेहानें स्थूलसृष्टींत ईशकार्य करावयाचें किंवा सूक्ष्मदेहानें सूक्ष्मसृष्टींत ईशकार्य करावयाचें हें जगाच्या गरज़ेवर व त्या त्या मुक्तपुरुषांच्या स्वभावविशेषांवर अवलंबून असतें. वेदान्ती परिभाषेंत बोलावयाचें म्हणजे जे पुरुष मुक्त झाल्यावर स्थूलदेह घेऊन ईशकार्य करतात ते प्रवृत्तिधर्माच़े कर्मयोगी होत; व जे विदेहमुक्त होऊन (म्हणजे स्थूलदेह धारण न करतां) सूक्ष्मदेहानें सूक्ष्मसृष्टींतील ईशकार्य करीत राहतात ते निवृत्तिधर्मीय संन्यासवृत्तीचे ज्ञानयोगी होत. 'ज्ञानयोगेन सांख्यानां' आणि 'कर्मयोगेन योगिनाम्।' अशा ज्या दोन निष्ठा किंवा मार्ग गीतेंत सांगितले आहेत ते हेच़ होत.]

ज्या जीवन्मुक्तांनीं पृथ्वीवरील दृश्य उद्योगांची ज़बाबदारी पत्करलेली असते त्यांच्यामध्येंहि कार्यवैचित्र्यामुळें अनेक प्रकार असूं शकतात.


मुक्ति  व  पुनर्जन्म

ज्यांनीं मुक्ति मिळविलेली आहे, जीं माणसें ऋषिपदाला पोहोंचलेलीं आहेत, तीं ज़री सारीं तंतोतंत एकसारखीं नसलीं, ज़री त्यांच्यामध्यें उद्योगभेदामुळें व वृत्तिभेदामुळें  अनेक फरक असले, तरी कांहीं मूलभूत बाबतींत त्या सर्वांमध्यें साम्य असतें हें विसरतां कामां नये. त्या सर्वांच़ा विकास इतका झालेला असतो कीं, ते सर्व गुणांच़ें माहेरघर आहेत, परिपूर्णत्वाच़ा त्यांनीं कळस गांठलेला आहे, असें सामान्य प्रकारच्या माणसाला सहज़ वाटतें आणि या ठिकाणीं मानवी प्रगतीच़ा मार्ग संपतो अशी त्याची कल्पना होते. यावरून ऋषिपदास पोहोंचून मुक्त झालेला माणूस फारच़ उच्च दर्जास गेलेला असतो हें उघड आहे. जगांतील हिशोबानें पाहिलें तर त्याच्या ठायीं सर्व गुणांची, सर्व शक्तींची व सर्व ज्ञानाची परमावधि झालेली असते असें म्हणता येईल. मुक्त याच़ा अर्थ 'सुटलेला', 'मोकळा झ़ालेला' असा आहे. ज़ो अज्ञानाच्या, दौर्बल्याच्या, रागद्वेषाच्या बंधनांतून सुटला, जगाच्या शाळेंतील सारे धडे शिकून त्या शाळेंतून बाहेर पडला तोच़ मुक्त होय. अर्थात् अशा माणसाला जगापासून शिकावयाच़ें कांहीं उरलेलें नसतें आणि म्हणूनच़ त्याला पुनर्जन्म नसतो. साधारण माणूस अनुभवानें शहाणा होण्याकरतां पुनःपुनः जन्म घेत असतो. त्याची इच्छा असो वा नसो, उत्क्रांतीच़ा ओघ त्याला जन्ममरणाच्या चक्रावर एकसारखा फिरवीत असतो. मुक्ति मिळविलेल्या माणसाची वाढ सर्वांग-परिपूर्ण झालेली असते. अर्थात् जगांत त्याला नवीन कांहीं शिकण्यासारखें नसल्यामुळें तो ओघ त्याला त्या चक्रावरून फिरवूं शकत नाहीं. त्याच्यापुरतें तें चक्र ज़णूं थांबलेलें असतें असें म्हणतां येईल. म्हणून हा मनुष्य जगास शिकविण्यासाठीं ज़रूर तेव्हां स्वेच्छेनें जन्म घेऊन येईल, पण उत्क्रांतीच़ा क्रम त्याला जन्ममरणाच्या फेऱ्यांत लोटूं शकणार नाहीं. अर्थात् त्याच़े भावी जन्म त्याच्या स्वाधीन झालेले असतात; व ते जन्म त्याच्या स्वतःच्या विकासाकाठीं नसून जगाच्या उपयोगासाठीं असतात.


उद्योगाची  बैठक

सर्व ऋषितुल्य माणसांमध्यें आणखी एका बाबतींत साम्य असतें. त्या सर्वांनीं स्वतःच्या अनुभवानें ईश्वराच़ें अस्तित्व ज़ाणलेलें असतें.  सृष्टींतील निरनिराळ्या क्षेत्रांत  ईश्वराच़ा संकल्प व त्याची योजना काय आहे ह्याची त्यांना प्रत्यक्ष माहिती असते. ते ईश्वराशीं एकरूप झालेले असतात, आणि स्वाभाविकपणेंच़ सृष्टीच्या निरनिराळ्या भागांविषयींची ईश्वरानें आंखलेली योजना सफळ करण्यासाठीं ते झ़टत असतात. आपण व ईश्वरी शक्ति हे एक आहों, याच़ा त्यांना अंतरीं अनुभव असल्यामुळें त्या शक्तीच़े संकल्प पुरे करणें हा त्यांचा देहस्वभाव बनलेला असतो, म्हणूनच़ हा त्यांचा अष्टौप्रहर उद्योगच़ होऊन बसतो. सृष्टींतील कांहीं क्षेत्रें दृश्य आहेत व कांहीं अदृश्य आहेत. ईश्वरानें विशिष्ट योजना ठरवून विशिष्ट हेतूनें तीं अस्तित्वांत आणलीं आहेत, आणि कोणत्या रीतीनें व क्रमानें त्या क्षेत्रांतील विकास व्हावयाच़ा याच़ा नकाशाहि त्याच्या मनांत ठरलेला आहे. त्या क्रमानुसार नाना क्षेत्रांत ज़रूर ते नाना तऱ्हेच़े उद्योग करून तो ईश्वरी संकल्प पुरा करणें हें काम साऱ्या मुक्तांनीं अंगावर घेतलेलें  असतें. हीं कामें नक्की कोणत्या प्रकारचीं असतात तें सामान्य दर्जाच्या माणसास समज़णें कठीण असणार हें उघड आहे; तथापि मानवी मनाला ज़री या उद्योगांच़ें नीट आकलन होणें दुर्घट असलें, तरी मुक्त झालेले सर्व पुरुष या दिशेनें सदा उद्योग करीत असणार हा सर्वसामान्य विचार सुबुद्ध माणसाला कळणें व पटणें कठीण नाहीं.


जगांतील  पुढारी

जगांत जीं माणसें लौकिकदृष्ट्या मोठीं म्हणून प्रसिद्ध असतात त्यांच्यामध्यें व मुक्ति मिळविलेल्या या सिद्ध पुरुषांमध्यें पुष्कळच़ फरक असतो. जगांत मोठीं  समजलीं  ज़ाणारीं माणसें प्रायः एकेक बाज़ूनें थोर झ़ालेलीं असतात. नेपोलियन हा महायोद्धा म्हणून फार मोठा होता, पण नीतिमत्तेंत तो सामान्य प्रकारच़ा किंवा त्याहूनहि फारच़ कमी भरण्याच़ा संभव आहे. कालिदास हा कवित्त्वाच्या क्षेत्रांत उच्चासनावर बसण्याज़ोगा असला तरी पराक्रम करण्याच्या बाबतींत त्याच़ा नंबर प्राकृतजनांसारखाच लागेल. न्यूटन किंवा भास्कराचार्य हे ज्ञानाच्या एका शाखेंत अग्रगण्य होते; पण जिव्हाळ्याची भक्ति ज्यांच्या अंतरंगांत आहे अशा भक्तांच्या मानानें भक्ति व प्रेम यांच्या क्षेत्रांत त्यांस कोणीं फारशी किंमत देणार नाहीं. पण जीं माणसें मुक्त झालेलीं आहेत त्यांचा विकास अष्टपैलू व सर्वांगीण असतो. त्यांचें ज्ञान उत्कृष्ट शास्त्रज्ञापेक्षांहि जास्त असतें. त्यांचें प्रेम, त्यांची चित्तशुद्धि हीं मोठमोठ्या साधूंपेक्षांहि अधिक असतात; आणि त्यांच़ा पराक्रम जगांतील महापराक्रमी माणसांपेक्षांहि उच्च असतो. मुक्तांच्या अंगांत कोणताहि दोष नसतो आणि सर्व गुण त्यांच्यामध्यें परमावधीच़े विकसित झालेले असतात. मानवी योग्यतेची अशी कोणतीहि बाज़ू नाहीं -- मग ती सामर्थ्याची, बुद्धिमत्तेची अगर नीतिमत्तेची असो -- कीं जिच़ा परमोच्च विकास त्या नरश्रेष्ठामध्यें झालेला नाहीं. ज्ञान, इच्छा व क्रिया हीं जीं मानवी विकासाचीं तीन प्रमुख अंगें आहेत त्या दिन्ही दिशांनीं तो माणूस फार पुढें गेलेला असतो. जगांत जीं मोठीं माणसें असतात त्यांच़ा विकास प्रायः सर्वांगीण नसतो व ज़री त्यांची एकेका बाबतींत वाढ झालेली असली तरी त्या त्या बाबतीतलीहि प्रगति जीवन्मुक्तांच्या मानानें फारच़ कमी असते. मुक्त पुरुष हा भगवान् श्रीकृष्णासारखा, गौतमबुद्धासारखा सर्व बाजूंनीं आदर्श पुरुष असतो आणि लौकिकांतील अग्रगण्य माणसांमध्यें आणि त्यांच्यामध्यें नुसता अष्टपैलूपणाबाबत फरक असतो इतकेंच़ नव्हे तर जगानें पुढारी म्हणून मानलेलीं माणसें उत्क्रांतिमार्गावर या मुक्तांच्या मानानें फारच़ मागें असतात. मुक्ताच़ा विकास सर्व बाज़ूंनीं झ़ालेला असल्यामुळें, त्याला ईश्वराच्या अस्तित्वाच़ा व स्वरूपाच़ा संपूर्ण प्रत्यय असतो. आपण ईश्वराशीं एकरूप आहों असा अखंड अनुभव त्याच्या अंतर्यामीं वसत असतो. अर्थात् ईश्वरानें निर्मिलेल्या जगाची त्याच्या संकेतानुसार प्रगति करणें हें तो आपलें अवश्य-कर्तव्य समजतो आणि त्यासाठीं सारखा झ़टत असतो. ईश्वरी प्रवाहाशीं तो एकरूप झ़ालेला असल्यामुळें आपण वेगळे आहों ही त्याची भावना अजिबात नष्ट झालेली असते आणि म्हणूनच़ स्वतःच़ें वेगळें असें त्याला कोणतेंहि उद्दिष्ट नसतें. तो बुद्धिपुरस्सर ईश्वराच्या संकल्पाची परिपूर्ति करीत असतो; व त्या संकल्पास ज्या ज्या गोष्टींचा अंतराय होत असेल, त्या हाणून पाडण्याच़ा तो प्रयत्न करतो. ईश्वर व त्याची योजना हीं ओळखून त्या योजनेंतील कांहीं भाग बुद्धिपुरस्सर आपल्या शिरावर घेऊन तो तडीस नेणें ही गोष्ट तो स्वभावतःच़ करीत असतो. त्यांत त्याच्या स्वतःच्या आवडीनिवडीच़ा प्रश्न बिलकुल उपस्थित होत नाहीं, कारण ईश्वरकार्यावेगळी त्याला निराळी आवड उरलेली नसते. जगांत जीं मोठीं म्हणून समज़लीं गेलेलीं माणसें असतात त्यांची तऱ्हा याहून अगदीं वेगळी असते. ईश्वर आहे व जगाच्या उत्क्रांतीची त्यानें एक योजना आंखली आहे, याची त्यांना प्रायः कल्पनाहि नसते मग प्रत्यक्ष ज्ञान कोठलें ? अर्थात् बुद्धिपुरस्सर त्या योजनेंतला एखादा भाग शिरावर घेऊन तो तडीस नेण्याचें कार्य असल्या लोकांच्या हातून घडणें संभवनीय नाहीं. जगांतील उद्योगांत लौकिक रीतीनें पुढाकार घेणारे लोक व जीवन्मुक्त पुरुष यांत अशा प्रकारच़ा मूलभूत फरक असतो.

अलौकिक  विकासाची  बाजू

आणखीहि एका महत्त्वाच्या बाबतींत जगाच्या रंगभूमीवर लौकिकदृष्ट्या पुढें येणारीं माणसें व जीवन्मुक्त माणसें यांच्यामध्यें महदंतर असतें. अगदीं सामान्य प्रतीच्या माणसांमध्यें भावना-वासनांच़ा विकास काय तो कमीअधिक प्रमाणांत झ़ालेला असतो, विचार व तर्कशास्त्र यांची वाढ त्यांमध्यें फारशी झ़ालेली नसते. त्यांच्या मानानें पुढारलेल्या माणसांमध्यें विचारशक्तीचा व तर्कबुद्धीच़ा विकास बराच़ झ़ालेला असतो. पण ह्या मंडळींमध्येंहि तात्त्विक विचार नीट करूं शकणारीं माणसें थोडीं असतात, आणि त्यापुढची अंतःप्रतिभा जागृत असणारीं माणसें तर सध्यां जगांत अगदींच़ विरळ आहेत. जीवन्मुक्त पुरुषांमध्यें सर्वच़ गोष्टींच़ा संपूर्ण विकास झ़ालेला असतो. मनाच्या भूमिकेच्या पलीकडे अंतःप्रज्ञेची एक भूमिका आहे. या अंतःप्रज्ञेलाच़ गीतेंत 'बुद्धि' (मनसः तु परा बुद्धिः) व पातंजल सूत्रांत 'प्रतिभा' असें म्हटलें आहे. तर्कशास्त्राचा आधार न घेतां ही अंतःप्रज्ञा (Intuition) किंवा प्रतिभा तत्काळ सत्य उमज़ूं शकते. जीवन्मुक्तांमध्यें ती संपूर्ण जागृत झ़ालेली असल्यामुळें अंतरंगांत त्यांना एक नवेंच़ दालन खुलें झ़ाल्यासारखें असतें. 'यो बुद्धेः परतस्तु सः।' अशी अंतःप्रज्ञेच्या भूमिकेच्याहि पलीकडे आत्म्याची आणखी एक भूमिका आहे. जगांतील मोठमोठ्या लोकनायकांस या भूमिकेच़ा मागमूसहि नसतो. पण जीवन्मुक्तांच्या अंतर्यामीं तेंहि दालन खुलें झ़ालेलें असतें. आत्मा व बुद्धि यांचीं अंतर्यामींचीं दालनें खुलीं झालीं कीं, त्यांच्या अंगीं अद्भुत शक्ति उत्पन्न होतात; व ज्ञान मिळविण्याचीं जणूं नवीन महादिव्य साधनें त्यांना उपलब्ध झ़ालेलीं असतात. खेरीज़ स्थूल - सूक्ष्म - कारण वगैरे देहांची त्यांची वाढ परिपूर्ण होऊन सृष्टींतील सारी अदृश्यसृष्टि त्यांना उघडी होते, आणि निरनिराळ्या सूक्ष्मलोकांत हिंडून फिरून त्यांना तेथें नाना व्यवहार करण्याच़ें सामर्थ्य येतें. आपण ज्यांना योगसिद्धि म्हणतों त्या सर्व त्यांना प्राप्त झ़ालेल्या असतात. जीवन्मुक्त पुरुषांच़ा सर्व बाज़ूंनीं परिपूर्ण विकास झ़ालेला असतो असें आम्हीं वर म्हटलें आहे. त्या सर्वांगीण विकासामध्यें या साऱ्या व दुसऱ्या अनेक शक्तींच़ा समावेश होत असतो हें लक्षांत घेतल्यास जीवन्मुक्त पुरुष व लौकिक रीत्या जगांत पुढें आलेला माणूस यांत किती मोठें अंतर असतें, याची कांहीं कल्पना आमच्या वाचकांना येईल.

सांप्रतकाळीं या पृथ्वीवर मुक्ति मिळविलेले अनेक पुरुष विद्यमान आहेत. ते अनेक प्रकारच़े उद्योग करीत असतात. त्या बहुतेकांच़े उद्योग अशा प्रकारच़े असतात कीं त्यांच़ें आकलन सामान्य बुद्धीच्या माणसाला होणें सोपें नाहीं. त्यांच्या उद्योगांपैंकीं जो भाग थोडाफार आपणांस समज़ण्यासारखा आहे त्याच़ें दिग्दर्शन या पुस्तकांत पुढें केलें ज़ाईल. आपल्या उद्योगांस अज्ञ लोकांच़ा व्यत्यय न येतां ते सारे निर्विघ्नपणें एकसारखे च़ालूं रहावे म्हणून हे जीवन्मुक्त पुरुष जनसंमर्दापासून प्रायः दूर व प्रशांत अशा ठिकाणीं राहतात व आपल्या योग्यतेची ग्वाही जगांत फिरवीत नाहींत.

सध्यां पृथ्वीवर मुक्ति प्राप्त झालेले जे अनेक पुरुष आहेत, त्यांपैंकीं कांहींज़ण होतकरू माणसांस हातीं धरून त्यांस शिष्य म्हणून पत्करतात आणि त्या शिष्यांची एकसारखी उन्नति करून कालवशात् त्यांसहि मुक्त पदवी मिळवून देतात हें वर आलेंच़ आहे. नेहमींच्या क्रमाप्रमाणें ज़ो विकास सावकाश व्हावयाचा तो विकास अशा शिष्याला अत्यंत शीघ्रगतीनें करावा लागतो आणि म्हणूनच़ त्याला त्याच़े फार श्रम वाटतात. जीवन्मुक्ताच़ा शिष्य होणें म्हणजे ज्या विकासास एरव्हीं शंभर दोनशें जन्म लागावयाच़े, तें कार्य दहापंधरा जन्मांत संपवून टाकणें होय. अर्थात् हा उद्योग अत्यंत बिकट असणार हें उघड आहे. म्हणूनच़ हा मार्ग वस्तऱ्याच्या धारेसारखा तीक्ष्ण व दुर्गम आहे असें उपनिषदांनीं सांगितलेलें आहे. विश्रान्ति घेतघेत व वळणांवळणांनीं च़ढत च़ढत डोंगराच्या माथ्यावर ज़ाणें सोपें असतें. पण त्याला वेळहि पुष्कळ लागतो. परंतु नाकासमोरच़ा सरळ रस्ता धरून तडक उभा च़ढाव च़ढत डोंगराच़ा माथा गांठणें कठीण असतें. माणूस धीट व सशक्त असेल, त्याला हिंमत व हौस वाटत असेल, त्याच्या अंगांत रग असेल, अडच़णींना तो बिलकुल भीक घालीत नसेल, तरच़ त्याला या सरळ पण उभ्या वाटेनें हा उत्क्रांतीचा च़ढाव एकदम च़ढण्याची क्रिया साधेल. मात्र तें काम साधल्यास त्याला स्वतःच़ें उद्दिष्ट फारच़ थोड्या वेळांत गांठतां येईल. जीवन्मुक्तांच़ा ज़ो शिष्य होईल त्याला असाच़ प्रयत्न करावा लागतो. जीवन्मुक्त पुरुष जेव्हां एखाद्या माणसाला शिष्य म्हणून स्वीकारतो तेव्हां त्याच्या डोक्यांत नुसती माहिती कोंबून त्याला शब्दज्ञान देण्याच़ा त्याच़ा उद्देश बिलकुल असत नाहीं. ज़सा एखादा शिल्पकार आपल्या मदतीस एखादा होतकरू तरुण उमेदवार म्हणून घेऊन आपलें शिल्पकाम करतो आणि तें काम च़ालूं असतांना तो उमेदवार त्याच्या हाताखालीं हळूंहळूं काम शिकून ज़सा स्वतः शिल्पकार बनतो, तद्वत् जीवन्मुक्ताच्या शिष्याची स्थिति असते. व्यक्तिशः त्या शिष्यास नुसतें शहाणें करावें असा त्या जीवन्मुक्ताच़ा मनोदय असत नाहीं. आपल्या कामांत आपणांला एक मदतनीस मिळावा, हळूंहळूं त्या मदतनिसानें सारें काम शिकावें व अशा रीतीनें ईश्वराच़ा संकल्प तडीस नेण्यास आणखी एक माणूस तयार व्हावा असा उद्देश मनांत ठेवून जीवन्मुक्त पुरुष होतकरू माणसास हातीं धरतात. त्यांना शिष्य म्हणण्यापेक्षां ईश्वरी कार्य शिकण्यास ठेवलेले उमेदवार म्हटलें तर तें अधिक शोभेल. हा उमेदवार भराभर शहाणा होत ज़ातो. त्याच़ा सर्वांगीण विकासहि होत असतो हें खरें आहे. पण ईश्वरकार्यासाठीं तो शिष्य अधिकाधिक उपयोगी पडावा या हेतूनेंच़ त्याचा विकास करण्यांत येतो. रिकामपणीं त्याच्या डोक्यांत शाब्दिक ज्ञान भरून त्याला पंडित करण्याचा उद्देश कोणाहि जीवन्मुक्ताच्या मनांत नसतो.

जीवन्मुक्त पुरुष होतकरू माणसांस कोणत्या प्रकारें ज़वळ करतात, त्यांच्या छत्राखालीं आलेल्या माणसांस कसें वागावें लागतें, त्यांची प्रगति कशी होते, त्या प्रगतीच़ा मार्ग कसा आहे, ज्या माणसास एखाद्या जीवन्मुक्त पुरुषाचा शिष्य होण्याची उत्कट इच्छा असेल त्यानें काय केलें म्हणजे त्याची ती इच्छा सफल होईल वगैरे अनेक  प्रश्न या प्रकरणीं महत्त्वाच़े आहेत. या मार्गास एकदां ज़ो लागला तो सरतेशेवटीं स्वतः मुक्त होत असतो, इतकी या मार्गाची थोरवी आहे. तेव्हां या मार्गासंबंधाची कांहीं माहिती वाचकांसमोर ठेवून त्यांच्या मनांतील शंकांच़ें निरसन करावें व या मार्गानें ज़ाण्याची हौस त्यांच्या हृदयांत उत्पन्न करावी या हेतूनें आम्हीं हें पुस्तक लिहिलें आहे. त्यासाठीं जीवन्मुक्त पुरुष, मुमुक्षुमार्ग, त्या मार्गावरील अधिकार व अडचणी, शिष्यत्वाच्या निरनिराळ्या पायऱ्या, मार्गावरील टप्पे वगैरे विषयींची माहिती आम्हीं या पुस्तकांत पुढें दिली आहे. ती माहिती काल्पनिक किंवा स्वकपोलकल्पित नाहीं. सांप्रतकाळच्या कांहीं व्यक्तींनीं ती स्वानुभवानें मिळविलेली आहे, हें वाचकांनीं विसरूं नये. त्या माहितीची तर्कदृष्ट्या भवति न भवति न करतां सरळ शब्दांनीं व सुबोध रीतीनें ती येथें वाचकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. कारण हें पुस्तक मुमुक्षूला मार्गदर्शक व्हावें ही एकच़ इच्छा मनांत धरून आम्हीं हें पुस्तक लिहिण्यास प्रवृत्त झालों आहों.

  *  *  *  *  *

back to bindhast : home          अनुक्रमणिका         प्रकरण २ : जीवन्मुक्त पुरुष व त्यांची राहणी