॥ रज्जुचक्षू ॥

शेवटल्या बदलाची तारीख़ २०१५०१३१
२४नोव्हेंबर १९१४ ची एक बातमी.
 
वरील बातमीच्या संदर्भांत, डिसेंबर २०१४ च्या 'साधना' मासिकांत प्रसिद्ध झ़ालेला, श्री.मुकुंद टाकसाळे यांच़ा एक लेख :

रज्जुचक्षू प्रकल्प


रज्जुचक्षू प्रकल्प. ही सोय अगदीं 'मस्ट' होती. आणि ज्यांनीं ही सोय 'वैकुंठ' स्मशानभूमींत उपलब्ध करून दिली त्या 'निनाद' या संस्थेच़े मानावेत तेवढे आभार थोडेच़ आहेत. याबद्दल पुणेंकर नागरिक त्यांच़े जन्मभरच़ काय, पण मेल्यावरसुद्धां ऋणी राहतील.


सध्यां पुण्यांत घरटीं एक ज़ण परदेशांत आहे. तो (किंवा ती) 'एक ज़ण' बऱ्याच़दां आज़च्या सुशिक्षित पद्धतीप्रमाणें एकुलता एक (किंवा एकुलती एक) असतो (किंवा असते). इकडे भारतांत म्हणजे पुण्यांत म्हातारा-म्हातारी एकटे (किंवा दुकटे) राहत असतात. खेड्यांतल्या पद्धतीनें 'म्हातारा-म्हातारी' म्हटलं तरी ते च़ांगले टुणटुणीत असतात. हास्य क्लबनृपो, सवाई गंधर्व, फ़िल्म फ़ेस्टिव्हलमधल्या फ़िल्मा वगैरे गोष्टींत त्यांनीं मन रमवून घेतलेलं असतं. तिकडे अमेरिकेंत नातवंड झ़ालें तर कम्प्यूटरच्या स्क्रीनवरून त्याच़ें रोज़च्या रोज़ दर्शन होत असतें. त्या नातवंडाची रोज़ची ख़बरबात घेतली ज़ाते. ख़बरबातीच़ा हा 'तास' तसा दोन्हीं पार्ट्यांना कंपल्सरी असतो. मुलं भारतांतच़ राहिलीं असतीं तर हें शक्य झ़ालं असतं कां? त्यांनीं आई-वडिलांसाठीं असा रोज़च़ा एक तास बाज़ूला काढला असता कां? तेव्हां कम्प्यूटरच्या कॅमेऱ्यानें आई-बापांना मुलांच्या अधिक ज़वळ आणलं, हें सत्य नाकारून च़ालणार नाहीं.


या कंप्यूटरच्या कॅमेऱ्याच्या करामतीनें आज़काल भारतीय (खरं तर हिंदूच़) संस्कृती राखणंसुद्धां फार सोपं झ़ालेलं आहे. उदाहरणार्थ- अमेरिकेंतल्या नातवाला भारतीय संस्कृतीची ओळख व्हावी म्हणून तिकडे गणपती बसविलेला असतो, पण त्यांच्यापैंकीं कुणालाच़ आरती पाठ नसते; तर इकडून आजी-आज़ोबा आरती गात असतात आणि तिकडे नवरा-बायको निरांजनयुक्त ताम्हण भक्तिभावानें फिरवत असतात. नातवंड हें अद्भुत दृश्य डोळ्यांत सांठवून घेत असतं. या पद्धतीनें साखरपुडासुद्धां होतो. साखरपुड्यांतील 'साखर' नांवालाच़. मुलगा मुलीला एन्गेजमेन्टची रिंग म्हणजे अंगठी घालत असतो आणि भारतांतून एक भटजी या विधीला साज़ेसे मंत्र म्हणत असतो. दोघांच़े देशोदेशींच़े नातेवाईक आपापल्या कंप्यूटरवर हें दृश्य पाहून त्या दोघांच़ं टाळ्या वाज़वून अभिनंदन करत असतात. छोटा नातू त्याच्या वाढदिवसाला तिकडे केक कापून कपाळावर टिळाबिळा लावून फ़ॅब इन्डियाच्या झ़ब्ब्यांत औक्षणासाठीं सोफ़्यावर बसलेला असतो आणि भारतांतून त्याची आजी त्याला (म्हणजे स्क्रीनला) ओवाळत असते. 'लिंबलोण उतरूं कशी असशी दूर लांब तूं' ही आजीची अडच़ण मराठी कवीनें ज़ाणली होती आणि त्याच़ं उत्तरही पुढें दिलेलं होतं- 'इथुन दृष्ट काढते निमिष एक थांब तूं!' लक्षांत घ्या- ज्या काळांत कंप्यूटर नव्हता, त्या काळांत कविराजांनीं हें उत्तर दिलेलं होतं, 'बाळा, तिथंच़ एक क्षणभर थांब. मीं तुझी दृष्ट कंप्यूटरसमोरच्या छोट्या पडद्यासमोर उभं राहूनच़ काढते'. केवढें हें द्रष्टेपण! ग्लोबल व्हिलेजची कल्पना प्रत्यक्षांत आल्यावर सारींच़ 'व्हिलेजर' मंडळी आनंदांत असतात.


मध्यंतरीं पुण्यांतल्या डेक्कन जिमखान्यावर राहणारी एक मॉडर्न माता विलक्षण धन्यतेनं आपल्या मुलाच़ं कौतुक सांगत होती, "आमच्या रोहनला टाइम स्क्वेअरवरच्या (नमोरुग्णांच्या) गर्दींत 'मोदी', 'मोदी', असं ओरडत नाच़तांना पाहिलं. एकदां तर... कोण तो मेला इंग्रजी टीव्ही जर्नलिस्ट... काय बरं त्याचं नांव... अं... आठवलं... राजदीप सरदेसाई... त्याला आमच़ा रोहन धक्काबुक्की करतांनाही दिसला." कुठं पुणं आणि कुठं टाइम स्क्वेअर! पण आई आपल्या अमेरिकेंतल्या लाडक्या लेकाच़ा पराक्रम घरबसल्या पाहूं शकते.


एवढं सारं असूनही अज़ून इंडियांत बाप मरायला लागला तर सातांसमुद्रांपल्याडहून मुलाला प्रत्यक्ष देहानं त्याला पाहायला यावं लागतं. साधारणपणें परिस्थिती डॉक्टरांच्या हाताबाहेर ज़ायला लागली कीं, सॅन होज़ेमधून मुलाच़ा डॉक्टरांना च़ौकशीच़ा फ़ोन ज़ातो. डॉक्टर 'आतां कांहीं खरं नाहीं' असं म्हणाले कीं, मोठ्या मुश्किलीनें चार दिवसांची रज़ा टाकून मुलगा, ऐनवेळीं तिकीट काढल्यानें प्रचंड महाग पडलेल्या विमानप्रवासाच़ें दिव्य करून, दुःखी अंतःकरणानें 'जेट लॅग'लेल्या अवस्थेंत पुण्यांतल्या हॉस्पिटलांत हज़र होतो. बापाची स्थिति खरोखरच़ दुर्दैवाची असते. एरवीं भावनेवर ज़गणारा मुलगा गेल्या-गेल्या एकदम बुद्धिनिष्ठ भूमिका घेऊन डॉक्टरांना स्पष्ट सांगतो, "आतां त्यांना फार काळ यातना देण्यांत अर्थ नाहीं. त्यांना 'सपोर्ट सिस्टिम'वर ज़गवण्यांत अर्थ नाहीं." आतां फक्त 'वाट पाहणें' मुलाच्या हातांत असतें. नियतीच़ा क्रूरपणा पहा. मुलगा प्रेमापोटीं एवढ्या दूरवरून आला, हें पाहून बापाची तब्येत अचानक सुधारायला लागते. दर दिवसागणिक होणारी ही सुधारणा पाहून मुलगा अस्वस्थ होऊं लागतो. डॉक्टरांना तो दुखावल्या स्वरांत विचारतो, "पण तुम्हीं तर म्हणाला होतांत...?"


"मिरॅकल घडूं शकतं." डॉक्टर उत्तर देतात. आपल्याच़ नशिबीं हें 'मिरॅकल' यावं, याच़ं मुलाला वाईट वाटत राहतं. आणखी तीन दिवसांची रज़ा तो मोठ्या मुश्किलीनें वाढवून घेतो. मोलकरणीनं मयताच़ं कारण सांगून दांडी मारली कीं घरच्या मालकिणीच़ा चेहरा ज़सा होतो, तसा चेहरा यावेळीं त्याच्या अमेरिकेंतल्या बॉसच़ा होत असावा. तिकडे मुलांच्या शाळेच़ं निमित्त करून राहिलेल्या बायकोच़ा रोज़ फ़ोन येत असतो- 'गेले कां?' अखेर हंसत्या खेळत्या बापाच़ा निरोप घेऊन मुलगा परत ज़ायला विमानांत बसतो. न्यूयॉर्कच्या जे.एफ़.केनेडी विमानतळावर उतरल्या उतरल्या त्याच़ा मोबाईल खणखणतो, 'वडील गेले!' आतां उलट्याच़ाकीं परत भारतांत ज़ाणं तर शक्य नसतं. त्यामुळं जिवंतपणीं घडलेलं बापाच़ं दर्शन हेंच़ 'अंत्यदर्शन' मानून मनाची समज़ूत पटवावी लागते.


अंत्यदर्शन नाहीं, अंत्यविधीला हज़र राहतां येत नाहीं- असं दारुण दुःख ज्या अमेरिकेंतल्या नातेवाइकांच्या वांट्याला येत असतं, त्यांची सोय 'निनाद' संस्थेनें आपल्या 'रज्जुचक्षू' या प्रकल्पानें केलेली आहे. या प्रकल्पाच़ं उद्घाटन सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनीं केलं. त्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कसबा विभागाच्या सहसंघचालकांपासून भाजपच्या आजी-माजी नगरसेवक-सेविकांपर्यंत झ़ाडून साऱ्यांची उपस्थिती होती. या उद्घाटनाला सामाजिक न्यायमंत्र्यांनीं हज़र राहून एक वेगळाच़ पायंडा पाडला, यांत शंका नाहीं. आतांपर्यंत 'सामाजिक न्याय' म्हटला कीं, तो फक्त दलितांना आणि उपेक्षितांनांच़ देण्याची भाषा काँग्रेसच़े किंवा राष्ट्रवादीच़े नेते करायच़े. (नुसती भाषा करायच़े, 'सामाजिक न्याय' देण्याच्या भानगडींत तेही पडायच़े नाहींतच़.) पण फक्त गांवकुसाच्याच़ नाहीं तर देशकुसाच्याही बाहेर राहणाऱ्या उपेक्षित एन.आर.आय. वर्गाची दखल कोणींच़ घेत नव्हतं. या 'रज्जुचक्षू प्रकल्पा'नें त्यांना पहिल्यांदांच़ सामाजिक न्याय मिळाला आहे. आतां परदेशांतले नातेवाईक बसल्या ज़ागेवर बिअर वगैरे पीत हा सोहळा पाहूं शकतील आणि आपलं दुःख गडद करूं शकतील.


या प्रकल्पांतील एक उणीव ज़ातां-ज़ातां सांगितली पाहिजे. माजी नगरसेवक उदय ज़ोशी म्हणाले, "...या माध्यमांतून विद्युत्दाहिनीच़ा वापर वाढणार असून लाकडाच़ा वापर कमी झ़ाल्यानें पर्यावरण संतुलन राखण्यास मदत होणार आहे." त्यांच्या या वक्तव्यानें पुरोगामी मंडळींची बाज़ू बळकट होण्याची दाट शक्यता आहे. हा प्रकल्प आणण्यापूर्वीं 'गंगामंत्री' उमा भारती किंवा 'सनातन प्रभात'वाल्या मंडळींपैंकीं कुणी कमिटीवर घेतलं असतं तर 'पर्यावरणाची काळजी करण्यापेक्षां चितेवर ज़ाळणं हिंदू धर्माच्या दृष्टीनें कसं महत्त्वाच़ं आहे', हें त्यांनीं पटवून दिलं असतं. थोडक्यांत काय, तर आतां रीतसर चितेवर ज़ळणाऱ्या हिंदू पार्थिवाच्या नशिबीं परदेशस्थ मुलाबाळांना आपलं अंत्यदर्शन घडवणं नाहीं, हेंच़ खरं. तेव्हां चिता पेटवितात, त्या ज़ागींही तांतडीनें कॅमेरा बसवून घेणें अगत्याच़ं आहे. आणखी एक- अलिकडे हॉस्पिटलमध्येंही डॉक्टरांच्या सोंगांत च़ोर शिरून पेशंटला लुबाडतात, म्हणून सुरक्षेच्या कारणानें कॅमेरे बसविले असतात. तोच़ सिग्नल सॅटेलाइटवर टाकून दिला, तर बापाची तब्येतही हळूंहळूं बिघडतांना परदेशांतल्या नातेवाइकांना पाहतां येईल. म्हणजे तेवढ्या कारणासाठीं विमानभाड्याची आणि रज़ेची नासाडी नको.


आतां 'रज्जुचक्षू' या संस्कृत शब्दाच़ा अर्थ 'केंद्रीय संस्कृतमंत्री' स्मृती इराणी यांना तरी पट्कन सांगतां येईल कीं नाहीं, ही शंकाच़ आहे. बहुधां 'रज्जू' म्हणजे 'केबल' असा अर्थ असणार. 'केबल'च्या 'चक्षूं' द्वारें- म्हणजे डोळ्यांद्वारें परदेशांतल्या लोकांनीं घेतलेलें 'अंत्यदर्शन'. 'रज्जू'च़ा अर्थ 'धागा' असाही होतो. प्रेमाच्या 'धाग्या'नें बांधलेल्या नातेवाइकांना अंत्यदर्शनासाठीं खास पुरविलेले 'डोळे' असाही अर्थ काढतां येऊं शकतो. संस्कृतची तीच़ गंमत आहे. कुणालाच़ कांहीं कळत नसल्यानें कांहींही अर्थ काढला तरी तो धकून ज़ातो.


----------------------------------------------------------------

लेखक : मुकुंद टाकसाळे
"
मुका म्हणे", साधना, ६ डिसेंबर २०१४
Go Back to bindhast : home