अशी ही मेहफ़िल

last updated 20110503
( पुण्यांत झालेल्या एका संगीत मैफिलीचा वृत्तांत )


क्ष म्युझिक क्लासच्या ग़ज़ल शिकणा-या विद्यार्थ्यांनीं गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम नुकताच सादर केला. रविवार दि. २२ आगष्ट १९९८ रोजीं रात्रौं ८।। वाजतां कार्यक्रम सुरूं होणार असल्याचें निमंत्रणपत्रिकेंतच छापलें होतें. कार्यक्रमाचा दिवस निमंत्रणपत्रिकेवरील तारखेप्रमाणें आहे, कीं वाराप्रमाणें आहे या विषयावर आमचे घरीं एक छोटासा परिसंवाद घडून आला. काहीं टारगटांनीं तर, विषयाचें गांभीर्य न जाणतां, "अहो, टिळक पंचांगानुसार यंदा २२ आगष्ट रविवारींच आहे" अशीं विधानें करून खसखस पिकविण्यासही कमी केलें नाहीं. प्रस्तुत वार्ताहरांनीं मात्र शनिवार दि. २२ आगष्ट ही तारीख अवलंबिण्याचें ठरविलें. निमंत्रणपत्रिका इंग्रजी लिपींत छापलेली असल्यामुळें कार्यस्थळाचें नांव काळदर्पण, कीं कालदर्पण, कीं कलदर्पण असावें याबद्दल रस्तोरस्तीं चाललेल्या चर्चाही ऐकण्यास मिळाल्या. जनतेच्या मनांतील संदेह पाहून शेवटीं आम्हीं त्यांना कलादर्पण हॉलकडे पाठविण्याचा निर्णय घेतला. सुदैवानें हा निर्णयदेखील बरोबरच ठरला.

कार्यक्रम एका मोठ्या दिवाणखान्यांत होता. दोन-अडीचशें पान उठूं शकेल अश्या. दिवाणखान्यांत भारतीय बैठकीची सोय असल्यानें मंडळींनीं बाहेरच्या प्रवेश-दालनांत पादत्राणें काढून ठेवलीं होतीं. पावसाळ्याचे दिवस असूनही उघडीप होती, त्यामुळें एवढें मोठें सभागृह रसिक प्रेक्षकांनीं गजबजून गेलें होतें. पुण्यांतील नामवंत कलाकारसुध्दां प्रेक्षकांमध्यें उपस्थित होते. उत्तम संगीत ऐकायला मिळणार या आतुरतेनें सर्वजण सरसावून बसले. सुसज्ज व्यासपीठ, त्यामागील पडद्यावर थर्मोकोलच्या भरगच्च बहुरंगी सजावटीमधून "गझलांजली"ची पाटी डोकावत होती. वाद्यांची जुळवाजुळव झाली, निवेदकानें आपली जागा घेतली, आणि ९।। च्या सुमारास कार्यक्रमाची सुरुवात झालीदेखील.

सर्वप्रथम गुरुवंदना झाली. त्यानंतर एकामागून एक विद्यार्थी-विद्यार्थिनी आपापली ग़ज़ल आपापल्या आवाजांत गाऊन जाऊं लागले. सर्व विद्यार्थिनी अद्ययावत् पोषाखांत होत्या. कांहींनीं खूप अलंकार घातले होते, कांहींनीं नव्हते. सर्व साड्यांचे व शलवार-क़मीज़ांचे रंग उत्कृष्ट होते.

प्रत्येक गायक अथवा गायिका येण्याआधीं निवेदक, "मोहतरम अमुकअमुक" अथवा "मोहतरमा तमुकतमुक'"असें त्यांचें नांव सांगे, आणि येणा-या ग़ज़लच्या शायराचें नांवही सांगे. ग़ज़ल सुरूं होण्यापूर्वीं "साज़ोंके दुरुस्त होनेतक" वेळ मिळाल्यास निवेदकाकडून उत्तमोत्तम शेरशायरीही ऐकावयास मिळे. जाणकार त्यास दाद देत होते. मींसुध्दां एकदोनदां दाद दिली, पण आसपासची मंडळी चमकून माझ्याचकडे पाहताहेतसें दिसलें. आपली दाद चुकीच्या वेळेस जात आहे हें चट्कन जाणून मीं तो नाद सोडून दिला. "ही भाषासुध्दां आपल्याला शिकायला हवी" अशी खूणगांठ मात्र मनाशीं बांधली.

मध्यंतर सुरूं होईतों पावसाचा जोर खूपच वाढला होता. प्रवेश-दालनांत पादत्राणांचा खच पडला होता. मध्यंतरांत कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांनीं क्ष म्युझिक क्लासला मोठीशी देणगी उत्स्फूर्तपणें जाहीर केली (होती). या देणगीचें स्वरूप "बोलाचीच कढी" या सदरांत मोडल्याचें कालांतरानें समजलें. सत्कार, भाषणें वगैरे कार्यक्रम चालूं असतांना कॉफीपानही सुरूं झालें. कॉफीची चव आणि कपांची स्वच्छता यांमध्यें चढाओढ असल्याचें भासत होतें.

कॉफीपान संपतें न संपतें तेवढ्यांत कार्यक्रमाचा उत्तरार्ध सुरूं झाला. मध्यंतराची वर्दळ स्थिरस्थावर होईतों आणखी एक ग़ज़ल उरकून झालीसुध्दां!

इकडे कांहीं रसिकांचा पादत्राणें शोधण्याचा कार्यक्रम सुरूं झाला होता. भारतांतले नामवंत कलाकारही एकमेकांना पादत्राणांच्या जोड्या शोधण्यांत साहाय्य करतांना आढळले. ज्या रसिकांना आपलीं पादत्राणें सांपडलीं, त्यांनीं पावसापाण्याची तमा न बाळगतां घरचा रस्ता सुधारला. "अहो, एवढा जोरांत नाहीं कांही पाऊस -- इथेंच तर जायचें आहे -- उद्यां कामाला जायचें आहे --" वगैरे उद्गार ऐकूं येत होते. कांहीं रसिक थोडा वेळ पादत्राणें शोधून, परत आंत येऊन, चालूं ग़ज़लेचा आस्वाद घेऊं लागले.

गाणा-या विद्यार्थ्यांचे गुरुजी व इतर मान्यवर ऋषितुल्य गायक, त्या विद्यार्थ्यांना यथाशक्ति धीर देत होते. गुरूंच्या चेह-यावरचा आपल्या शिष्यांबद्दलचा अभिमान व उत्तेजन कायम टिकून होतें. ते विद्यार्थीसुध्दां आपापल्या गाण्यांतलीं सर्व कडवीं म्हणून दाखविल्याशिवाय व्यासपीठ सोडीत नव्हते.

एक दाढीवाला विद्यार्थी कार्यक्रमभर चौफेर फोटोच काढतांना दिसत होता. ग़ज़लांच्या भावनाप्रधान व सांद्र वातावरणामुळें कीं काय, ते फोटोही तरल व धूसर आल्याचें नंतर समजलें. त्या दाढीवाल्यानें मोठ्या आदरानें गुरुजींना अर्पण केलेला तो आल्बम, पुढें क्लासमध्यें कधीं दिसलाच नाहीं.

आपला वार्ताहर जागा झाला तेव्हां पाऊस थांबला होता, प्रवेश-दालनांतली पादत्राणांची गर्दीही बरीच ओसरली होती, आणि उरलीसुरली मंडळी, आणखी एक रम्य मेहफ़िल पदरांत पडल्याच्या समाधानांत, झाला कार्यक्रम वाखाणत, घरच्या वाटेला लागत होती ...

(क्रमशः)


Go Back to bindhast : home